Nashik News, 14 Oct : गेल्या आठवड्यात नाशिक येथे काँग्रेसचा निवडणूक तयारीचा आढावा घेण्यात आला. यावेळी स्वबळाची भाषा करणारं काँग्रेस आपल्या भूमिकेत बदल करण्याची शक्यता आहे. पक्षातील एका गटाकडून शिवसेना आणि राज ठाकरे यांच्यासोबत जाण्याची चाचपणी होत आहे.
आगामी महापालिका निवडणुकांसाठी महायुती आणि महाविकास आघाडी जोरात कामाला लागली आहे. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आडवळणाने एकला चलोची भूमिका व्यक्त केली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी देखील स्वबळाची भाषा केली होती.
महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे काँग्रेसचे नेते रमेश चेन्नीथला यांच्या उपस्थितीत चर्चा केली आहे. काँग्रेस आपल्या राजकीय भूमिकेत बदल करून नवा प्रयोग करण्याच्या तयारीत आहे. काँग्रेसच्या उत्तर भारतातील राजकारणात भूमिकेचा प्रश्न आहे.
विशेषतः आगामी बिहारच्या निवडणुकांची जोरदार तयारी होत आहे. यामध्ये राज ठाकरे हे राजकीय दृष्ट्या उत्तर भारत आणि विशेषता बिहारमध्ये प्रचारातील मुद्दा होऊ शकतात. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्याबाबत काय भूमिका घ्यावी हा काँग्रेस पक्षापुढे प्रश्न आहे.
काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी याबाबत मनसेसोबत गेल्यास काय परिणाम होतील याची चाचपणी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रदेशाध्यक्ष सपकाळ, ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आणि अन्य नेत्यांनी याबाबतची चाचपणी केल्याचे कळते. या सर्वच पक्षांना आगामी मुंबई महापालिका महत्त्वाचा विषय आहे.
यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हाच मोठा भाऊ ठरण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने महाविकास आघाडीमध्ये एक नवा सहकारी येऊ शकतो. मनसेच्या वरिष्ठ नेत्यांनी या संदर्भात राज ठाकरे हेच अंतिम भूमिका घेणार असे स्पष्ट केले आहे. विशेषतः मुंबई महापालिकेत मुस्लिम समाजाची मते लक्षणीय आहेत.
त्याकडे दुर्लक्ष करणे कोणत्याही पक्षाला शक्य नाही. या मतदारांचा कल काँग्रेस आणि समाजवादी पार्टीकडे असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यातील महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत या निमित्ताने काँग्रेस आणि मनसे एकत्र आल्यास नवा राजकीय प्रयोग ठरेल. महत्त्वाच्या नेत्यांना फोडून भाजपने महाविकास आघाडीला खिळ खिळे केले आहे.
अशा स्थितीत महायुतीला मनसेसह महाविकास आघाडीचे आव्हान उभे राहू शकते. मनसे प्रमुख राज ठाकरे आणि काँग्रेस एकत्र येणार का हा दोन्ही पक्षांच्या समर्थकांमध्ये चर्चेचा विषय आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावण्याची शक्यता आहे. या दृष्टीने काय निर्णय होतो याची राज्याच्या राजकारणात उत्सुकता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.