
Mumbai, 12 January : भारतीय जनता पक्षाचे राज्यस्तरीय अधिवेशन आज शिर्डीत होत आहे. या अधिवेशनाच्या मंचावर महापुरुषांच्या सोबत संविधनाची प्रत ठेवण्यात आली आहे. त्यावरून काँग्रेसने भाजपवर निशाणा साधला आहे. संविधानाची दररोज पायमल्ली करणाऱ्या भाजपला आपल्या अधिवेशनात संविधानाची प्रत महापुरुषांच्या प्रतिमेसोबत ठेवावी लागते, हा काँग्रेसचा विजय आहे, असा दावा काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला आहे.
विधानसभा निवडणुकीत मोठ्या बहुमताने राज्यात सत्तेवर आलेल्या भारतीय जनता पक्षाचे (BJP) महाभरारी महाविजयी अधिवेशन शिर्डीत होत आहे. या शिबिरासाठी राज्यभरातील सुमारे १५ हजार पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे अधिवेशनाला उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व्यासपीठावर संविधानाचे पूजन करण्यात येणार आहे. त्यावरूनच काँग्रेसने भाजपवर निशाणा साधला आहे. भाजपचे हे संविधान प्रेम बेगडी आहे, असा टोला काँग्रेसकडून भाजपला लगावण्यात आलेला आहे. काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे (Atul Londhe) यांनी आपल्या एक्स अकाउंटवर पोस्ट करून भाजपवर टीकास्त्र सोडले आहे.
लोंढे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, दररोज संविधानाची पायमल्ली करणाऱ्या भाजपला आपल्या अधिवेशनात संविधानाची प्रत महापुरुषांच्या प्रतिमेसोबत ठेवावी लागते, हा काँग्रेसचा विजय आहे. पण, ज्यांनी संविधानाला प्रखर विरोध केला, ते शामाप्रसाद मुखर्जी आणि दिनदयाल उपाध्याय यांची प्रतिमा संविधानासोबत ठेवली आहे, त्यामुळे यांच्या संविधान निष्ठेवर प्रश्नचिन्ह कायम आहे.
मनुस्मृती जोपर्यंत पूर्णपणे नाकारत नाही, तोपर्यंत ही बेगडी निष्ठा शंकेच्या घेऱ्यातच राहील, असा टोलाही लोंढे यांनी भाजप नेतृत्वाला लगावला. त्यावरून आता काँग्रेस आणि भाजपमध्ये वाद पेटण्याची शक्यता नाकारता येत नाही. यावर भाजपकडून काय प्रतिक्रिया येते, हे पाहावे लागणार आहे.
दरम्यान, भाजपने लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात चारशे पारचा नारा दिला होता. मात्र, भाजपला संविधान बदलण्यासाठी चारशेपेक्षा अधिक जागा हव्या आहेत, असा प्रचार काँग्रेसकडून करण्यात आला होता. त्याचा जोरदार फटका भाजपला लोकसभा निवडणुकीत बसला होता, त्यामुळे भाजपला २४० वरच अडकून राहावे लागले होते.