
Ajit Pawar Dhule NCP event : कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी घातलेल्या घोळावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार धुळे इथं निर्णय घेणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादांची, मंत्री कोकाटे सोमवारी (ता. 28) मुंबईत भेट घेणार होते.
परंतु अजितदादांनी मंत्री कोकाटेंना धुळे इथं आज (ता. 24) होणाऱ्या पक्षीय कार्याक्रमात सहभागी व्हा, तिथं काय निर्णय घ्यायचा घेऊ, अशा थेट सूचना केल्याची खात्रीशीर माहिती मिळाली आहे. त्यामुळे कोकाटेंनी घातलेल्या घोळाचा अन् त्यांच्या राजकीय भवितव्याचा निर्णय धुळ्यात अजितदादा घेणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मुंबईतील पावसाळी अधिवेशनाच्या शेवटी राष्ट्रवादीचे मंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी ऑनलाईन रमी खेळतानाचा व्हिडिओ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पुढे आणला. यावरून मंत्री कोकाटेंविरोधात राज्यभर वातावरण तापलं आहे. याचा जाब विचारण्यासाठी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंकडे छावाचे कार्यकर्ते गेले असताना, तिथं सुरज चव्हाण आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे यांना मारहाण केली. यामुळे राष्ट्रवादीसह मंत्री कोकाटेंविरोधात राज्यात शेतकऱ्यांसह विरोधकांकडून निदर्शने सुरू आहेत.
मंत्री कोकाटे हा घोळ निस्तरण्याऐवजी तो वाढताना दिसत असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) देखील त्यांच्यावर नाराज झाले आहे. त्यामुळे हा घोळ निस्तरण्यासाठी काल बुधवारी मंत्री कोकाटे मुंबईत जाणार होते. परंतु मुख्यमंत्री फडणवीस पंढरपूर, तर उपमुख्यमंत्री अजितदादा पुणे दौऱ्यावर होते. त्यामुळे मंत्री कोकाटे यांनी मुंबईचा दौरा सोमवार (ता. 28) ढकलला. परंतु अजितदादांनी त्यांना आज (ता. 24) धुळे इथं होणाऱ्या पक्षीय कार्यक्रमात सहभागी होण्याच्या सूचना केल्या आहेत.
मंत्री कोकाटे यांची आक्षेपार्ह विधाने आणि वादग्रस्त वर्तणुकीमुळे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार नाराज आहेत. दोघांमध्ये दूरध्वनीवरून चर्चा झाली असून पवार यांनी त्यांना चांगलेच सुनावल्याचेही समजते. विधानपरिषदेत ऑनलाईन रमी खेळतानाचा व्हिडिओ बाहेर आल्यानंतर कृषिमंत्री कोकाटे यांच्यावर चौफेर टीका होत आहे. त्यानंतर त्यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन विरोधकांवर आगपाखड केली. त्याचवेळी एक रूपयात पीक विमा योजनेच्या संदर्भात आपल्या आधीच्या वादग्रस्त विधानाचे स्पष्टीकरण देताना त्यांनी राज्य सरकारबाबत वादग्रस्त वक्तव्य करून आणखी एक वाद ओढवून घेतला.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंत्री कोकाटे यांच्या या विधानावर तीव्र नाराजी व्यक्त केली. मुख्यमंत्र्यांनी देखील रमी प्रकरणातही कोकाटे यांना खडे बोल सुनावले होते. उपमुख्यमंत्री पवारांनी मात्र कोकाटे प्रकरणावर माध्यमांशी बोलणे टाळले. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सुरज चव्हाण यांना राजीनामा घेतला आहे. परंतु कोकाटे प्रकरणावर मात्र अजितदादांनी अजून जाहीर भूमिका मांडलेली नाही. धुळे इथल्या कार्यक्रमात मंत्री कोकाटे यांना हजर राहण्याची सूचना केली असून, तिथं अजितदादा कोकाटे यांना कोणता आदेश देणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
मंत्री माणिकराव कोकाटे वादग्रस्त वक्तव्यांनी कायम चर्चेत राहिले. त्यामुळे आता त्यांचे कृषि मंत्रिपद धोक्यात सापडले आहे. विरोधकांचा वाढता दबाव आणि सततच्या वक्तव्यामुळे राज्य सरकारची प्रतिमा मलिन होत असल्याने पक्षाकडून कारवाई होऊ शकते, असा अंदाज वर्तविला जातो. दरम्यान, त्यांनी काल बुधवारचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द केल्याने कार्यकर्त्यांची चलबिचल झाली. अनेक कार्यकर्त्यांनी दिवसभरात त्यांच्या नाशिकच्या निवासस्थानी भेट देत खात्री करत होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.