Devyani Pharande Won: नाशिक मध्य मतदारसंघात भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांनी सतरा हजार ८३३ मताधिक्याने आपला विजय नोंदवत हॅटट्रीक केली. विविध आरोप, प्रत्यारोपांनी हा मतदारसंघ राजकीय दृष्ट्या चर्चेचा विषय बनला होता.
या मतदारसंघात भाजप आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने प्रतिष्ठेचा केला होता. आज झालेल्या मतमोजणीत शेवटच्या फेरीअखेर आमदार फरांदे यांना एक लाख पाच हजार ६८९ मते मिळाली. शिवसेना ठाकरे पक्षाचे माजी ामदार वसंत गिते सत्याऐंशी हजार ८३३ मते मिळाली. समाजवादी पक्षाचे मुशीर सय्यद यांसह सात उमेदवारांची अनामत जप्त झाली.
मतमोजणी व निकालानंतर या मतदारसंघात मोठा तणाव होता. या मतदार संघात विविध उमेदवार असले तरीही, भाजपच्या देवयानी फरांदे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार वसंत गीते यांच्यात सरळ लढत झाली. या दुरंगी लढतीत दोन्ही उमेदवारांनी परस्परांवर अतिशय आक्रमक होत आरोप केले. या आरोपांमुळेच यंदाची निवडणूक गाजली.
भाजपच्या आमदार फरांदे यांच्या विरोधात पक्षात अनेक इच्छुक होते. या इच्छुकांनी आमदार फरांदे यांच्या उमेदवारीला विरोध केला होता. मात्र पक्षाने आमदार फरांदे यांना तिसऱ्यांदा उमेदवारी दिली. त्यामुळे आमदार फरांदे हॅट्रिक करणार का? हा विषय चर्चेत होता. त्याचे उत्तर आजच्या निकालातून आमदार फरांदे यांनी दिले.
विद्यमान आमदार फरांदे यांच्यावर ड्रग्स माफिया आणि काही वादग्रस्त लोकांशी संपर्क असल्याचा आरोप झाला. या आरोपावरून नाशिक शहर ड्रग्समुक्त करण्यासाठी उमेदवारी करण्याची घोषणा माजी आमदार गीते यांनी केली. शहरातील बेरोजगारी, आयटी पार्क आणि वाहतूक कोंडी यावर गीते यांनी भर दिला होता. आमदार फऱांदे यांनी मात्र विकासकामांवर प्रचारात भर दिला होता.
आमदार फरांदे यांनी गेल्या पाच वर्षात केलेल्या विकास कामांचा प्रचार केला. प्रतिस्पर्धी उमेदवार अवैध धंद्यांची संबंधित आहेत असा आरोप त्या करीत असतात. त्यामुळे यंदाची निवडणूक दोन्ही उमेदवारांतील टोकदार आरोपांनी चर्चेत राहिली.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी महायुतीला मागे टाकले होते. गेल्या निवडणुकीत येथे आमदार फरांदे, काँग्रेसच्या डॉ हेमलता पाटील आणि मनसेचे माजी आमदार भोसले यांच्यात तिरंगी लढत झाली होती. त्यात मत विभागणीचा फायदा आमदार फरांदे यांना झाला होता. यंदा मात्र आमदार गीते आणि आमदार फरांदे यांच्यातच सरळ सामना होताना दिसली. समाजवादी पक्षाचे मुशीर सय्यद आणि अन्य उमेदवार फक्त मतपत्रिकेवरच होते. खरा सामना रंगला तो भाजप आणि शिवसेनेच्या उमेदवारांतच.
या मतदारसंघात जुने नाशिक आणि वडाळा भागातील अल्पसंख्यांक मतांसह मोठ्या प्रमाणात ओबीसी मतदार आहेत. शहराच्या मध्यवस्तीत व्यापारी वर्गाचा बोलबाला आहे. गंगापूर रोड भागात मराठा समाजाचे वर्चस्व आहे, अशा विविध वर्गांमध्ये विभागलेल्या मतदारांना आपलेसे करण्यात उमेदवारांची दमछाक झाली. माजी आमदार गीते हे नामको बँकेचे संचालक आहेत. या बँकेच्या संचालकांचा शहराच्या विविध घटकांवर अप्रत्यक्ष प्रभाव आहे. त्याचा फायदा गीते यांना प्रचारात झाला.
-----
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.