
Dhule News : ध्वनी प्रदुषण होत असल्याने प्रशासनाने डीजेचा वापर करण्यास बंदी घातली आहे. परंतु यामुळे डीजे चालकांचे हातचे काम गेल्याने डीजे चालक धुळ्यात रस्त्यावर उतरले. कायद्याच्या अधीन राहून आवाजाच्या भिंती (डीजे) वापरण्यास परवानगी द्यावी अशी मागणी करत धुळे जिल्हा साऊंड डीजे चालक-मालक संघटनेतर्फे शुक्रवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
धुळे शहरातील छत्रपती अग्रेसन महाराज पुतळ्यापासून या मूक मोर्चाला सुरुवात झाली. डीजे चालकांनी यावेळी हातात काही फलक घेतले होते. अगोदरच बेरोजगारी खूप प्रमाणात आहे, मग तरी आमचा रोजगार हिरवतात का? साऊंड व्यावसायिकाला बेरोजगार करणे थांबवा अशा आशयाचे बॅनर घेऊन हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ धडकला व निवेदन दिले.
राज्यातील इतर कोणत्याही जिल्ह्यात डीजे ला बंदी नसताना केवळ धुळे जिल्ह्यातच बंदी का असा प्रश्न यावेळी संघटनेतील शिष्टमंडळाने केला. जिल्हा प्रशासनाच्या या कठोर भूमिकेमुळे हजारो युवक बेरोजगार झाले असल्याची तक्रार यावेळी संघटनेच्या शिष्टमंडळातील सचिन शेवतकर, जिल्हाध्यक्ष ललित वाघ, संघटनेचे उपजिल्हाध्यक्ष विक्की चौधरी यांनी केली.
निवेदनातून संघटनेने आपले म्हणणे मांडले, प्रशासनाने आवाजाची भिंत असलेली वाहने (डीजे) आणण्यासही परवानगी नाकारल्याने सर्वांनी एकत्रपणे पायी मोर्चा काढण्याचे ठरवले. राज्यात केवळ धुळे जिल्ह्यातच आवाजाच्या भिंतींवर पोलिसांनी प्रतिबंध घातला आहे. याचा परिणाम म्हणून जिल्ह्यातील हजारो युवक बेरोजगार झाले आहेत. इतकेच काय तर यंदाची गणेश विसर्जन मिरवणूकही यावेळी डीजेविना पार पडली. या निर्णयामुळे जिल्ह्यातील शेकडो आवाजाच्या भिंती चालक- मालक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाल्याचे निवेदनात म्हटलं.
पोलिसांनी घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात येईल असे आश्वासन देत यावेळी परवानगी देण्याची मागणी करण्यात आली. यावेळी कल्पेश पगारे, दिनेश कापडे, सचिन बडगुजर, भूषण गोसावी,सचिन बडगुजर, बंटी बडगुजर, पंकज बागले आदींसह डीजे चालक मालक संघटनेचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
भावनिक आवाहन
धुळेकर बांधवांनो, तुमच्या प्रत्येक आनंदात आम्ही साऊंड-डीजे वाले सोबत होतो. लग्नात, सणात, उत्सवात आमच्या तालावर तुम्ही नाचलात, हसलात, आनंद लुटलात. तोच आनंद दुप्पट करणं हेच आमचं काम होतं, आणि तोच आमचा अभिमान होता. पण आज आमच्यावर बंदी आली आहे. काय गुन्हा केला आम्ही? तुमच्या सुखात सहभागी झालो म्हणून का? तुमचा आनंद वाढवला म्हणून का? हा व्यवसाय आमच्यासाठी फक्त काम नाही -तो आमच्या कुटुंबाचा श्वास आहे, आमच्या जगण्याचा आधार आहे. आमचा आवाज दाबू नका, आमच्या उपजीविकेवर गदा आणू नका ! धुळेकरांनो, आम्हाला फक्त एकच हक्क हवा आहे -जगण्याचा, न्यायाने जगण्याचा ! असे भावनिक आव्हान सोशल मीडियातून डीजे चालकांकडून करण्यात येत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.