
Dhule politics : धुळे शहरातून वाहणाऱ्या पांझरा नदीवर वीर सावरकर पुतळा ते ज्योती चित्रपटगृहापर्यंत नवीन पूल होणार आहे. त्यासाठी आपल्या प्रयत्नातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून मंजुरी मिळाल्याचा दावा काँग्रेस खासदार डॉ. शोभा बच्छाव यांनी केला आहे. मात्र केंद्राकडून अशी कोणतीही मंजूरी मिळालेली नसून शोभा बच्छाव या खोट्या बातम्या प्रसिद्ध करत आहेत. यातून त्या धुळेकरांची दिशाभूल करत असल्याचा आरोप भाजपचे आमदार अनुप अग्रवाल यांनी केला आहे. खासदार बच्छाव यांनी आयत्या पिठावर रेघोट्या मारण्याचे काम करु नये, असा टोला आमदार अनुप अग्रवाल यांनी लगावला आहे.
धुळ्यात सध्या खासदार काँग्रेसचा आणि आमदार भाजपचा अशी परिस्थिती असल्याने श्रेयवादाची लढाई सुरु असून आरोप-प्रत्यारोप होत आहेत. त्यामुळे नवीन पूलाच्या बांधकामाच्या मुद्द्यावरुन दोघांमध्ये जुंपली आहे. वीर सावरकर पुतळा ते ज्योती चित्रपटगृहापर्यंत नवीन पूल बांधण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी निधीसह मंजुरी दिल्याची दिशाभूल करणारी माहिती देऊन खासदार बच्छाव यांनी आत्मस्तुती करणारी प्रसिद्धी पदरात पाडून घेतल्याची टीका भाजप आमदार अग्रवाल यांनी केली आहे.
यासंदर्भात आमदार अग्रवाल यांनी सांगितले की, वास्तविक पांझरा नदीवरील ब्रिटिशकालीन लहान पुलाच्या ठिकाणी मोठ्या पुलाचे बांधकाम करण्यासाठी नोव्हेंबर 2022 च्या अर्थसंकल्पात 9 कोटी रुपयांचा निधी मंजूर आहे. याबाबत राज्य शासनाच्या मुंबई येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संकल्प चित्र मंडळ (पूल) विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांकडून सध्या अस्तित्वात असलेल्या धुळे शहरातील लहान पुलाची पाहणी करून परीक्षण करण्यात आले आहे. त्यानुसार त्यानुसार हा पूल हलक्या वाहतुकीसाठी सुरक्षित असून, तो पाडू नये. असे निरीक्षण नोंदवले आहे. वेळोवेळी देखभाल व देखरेख केल्यास हा पूल अधिक काळासाठी सुरक्षित व वापरण्यायोग्य राहील आणि तोडून नवीन बांधकाम करण्याची सध्या आवश्यकता नाही, असा निष्कर्ष मांडण्यात आल्याचे अग्रवाल यांनी म्हटलं आहे.
शिवाय, या अहवालानंतर मी मंजूर नऊ कोटींच्या निधीतून पांझरा नदीवर सावरकर पुतळ्याला लागूनच दुसऱ्या ठिकाणी पूल बांधण्याबाबत राज्य शासनाकडे पाठपुरावा सुरू केला. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी या सर्वांना पत्रासह निवेदन देऊन नवीन पूल किंवा बंधारा बांधण्यास मंजुरी देण्याची मागणी केल्याचे आमदार अग्रवाल यांनी सांगितले आहे. सावरकर पुतळ्यालगत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हा पूल बांधण्यासाठी राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचे आमदार अग्रवाल यांनी सांगितले.
पांझरा नदी सुधारणा कार्यक्रमात पूल कम बंधारा असे या कामाचे नियोजन आहे. त्यासाठीचा सर्वेक्षण प्रस्तावही तयार केला असून, मंजुरीसाठी शासनाकडे दिला आहे. लवकरच प्रस्तावाला मंजुरी मिळून सध्या अस्तित्वात असलेला लहान पूल कायम ठेवून सावरकर पुतळ्यालगतच मंजूर 9 कोटींच्या निधीतून नव्याने पूल किंवा बंधारा बांधण्यात येणार असल्याचेही आमदार अग्रवाल यांनी स्पष्ट केले आहे. खासदार डॉ. बच्छाव यांनी कुठल्याही कामाचे श्रेय घेताना किमान चार वेळा विचार करावा. त्यांनी स्वतः केंद्रासह राज्य शासनाकडून धुळे शहरातील विकास कामांसाठी निधी मंजूर करून आणावा आणि मग श्रेयाची शेखी मिरवावी, आयत्या पिठावर रेघोट्या मारण्याचे प्रकार थांबवावेत, असा टोला आमदार अग्रवाल यांनी लगावला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.