Dhule news : धुळे शहरातील मनोहर चित्रमंदिरासमोरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्यासमोर अनधिकृत बांधकाम सुरू असल्याची बाब समोर आली आहे. या बेकायदेशीर कामाविरोधात माजी आमदार अनिल गोटे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे. न्यायमूर्ती मनीष पितळे आणि न्यायमूर्ती वाय. जी. खोब्रागडे यांनी प्रतिवादींना नोटीस बजावण्याचे निर्देश दिले आहेत.
धुळे महापालिकेतर्फे शहरातील मनोहर चित्रमंदिरासमोरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्यासमोरील गजबजलेल्या व वर्दळीच्या परिसरात अतिक्रमण करून सुरू असलेले बेकायदेशीर बांधकाम व सौंदर्यीकरणाचे काम रोखण्यात यावे अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.
मुख्य वर्दळीच्या आग्रा रोडवर सुमारे १५०० चौरस फुटांचे सुरू असलेले बांधकाम अपघातास कारण ठरू शकते, असे माजी आमदार अनिल गोटे यांचे म्हणणे आहे. शासन, स्थानिक स्वराज्य संस्था, अर्ध शासकीय संस्था आदींनी सार्वजनिक रस्ते, पादपथ (फुटपाथ), रस्त्यालगत आणि सार्वजनिक उपयोगाच्या जागा येथे पुतळे उभारण्यास प्रतिबंध करणारे २ फेब्रुवारी २००५ आणि २ मे २०१७ चे शासन निर्णयाद्वारे दिलेल्या मार्गदर्शक सूचना, निर्देश आणि सूचनांचे पालन करण्याचे आणि सर्वोच्च न्यायालयाने केंद्र शासन विरुद्ध गुजरात राज्य प्रकरणात दिलेल्या निर्देशांचे पालन करण्याचे आदेश प्रतिवादींना द्यावेत. अशी मागणी गोटे यांनी केली आहे.
तसेच वरील अनधिकृतपणे सुरु असलेलं बांधकाम रोखण्याचे आदेश प्रतिवादींना द्यावेत, तसेच त्यांच्या १६ एप्रिल २०२५ च्या तक्रारीची दखल घेण्याचे निर्देश द्यावेत, अशी विनंती याचिकेद्वारे माजी आमदार गोटे यांनी केली आहे. गोटे यांच्यातर्फे अॅड. अमोल माळी काम पाहत आहेत. दरम्यान या याचिकेवर १३ नोव्हेंबर २०२५ ला पुढील सुनावणी होणार आहे.
धुळेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर सुरू असलेल्या बेकायदेशीर बांधकामाला आळा घालण्यासाठी माजी आमदार अनिल गोटे यांनी न्यायालयीन लढा सुरू केला आहे. सार्वजनिक सुरक्षेला धोका असल्याचे नमूद करत त्यांनी बांधकाम रोखण्याची मागणी केली आहे. त्यामुळे पुढील न्यायालयीन सुनावणीकडे धुळेकरांचे लक्ष्य लागून आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.