Dilip Wagh News: पक्ष सत्तेत असला, मोठा झाला की त्याला गटबाजीचे ग्रहण लागते. भारतीय जनता पक्षालाही रावेर मतदारसंघात याच समस्येने ग्रासले होते. वरिष्ठांच्या सर्वच उपाययोजना आणि मध्यस्थी अयशस्वी ठरल्या होत्या. त्यावर नेत्यांनी एक जालीम उपाय केला आहे.
भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला पाचोरा मतदारसंघात मोठा धक्का दिला आहे. या मतदारसंघावर प्रदीर्घकाळ पकड असलेले माजी आमदार ओमकार वाघ यांचे चिरंजीव दिलीप वाघ यांचा भाजप प्रवेश झाला आहे. त्यामुळे भाजप आणखी मजबूत झाला आहे
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला भाजपचा हा मोठा धक्का मानला जातो. त्याचे बहुतांशी कार्यकर्ते आणि पदाधिकारी दिलीप वाघ यांच्यासोबत भाजपवासी झाले आहेत. त्यामुळे पक्षाला आता नव्याने सुरुवात करावी लागणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या घडामोडी राष्ट्रवादीला धक्कादायक ठरल्या आहेत.
पाचोरा विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षात अनिल शिंदे आणि मधुकर काटे हे दोन गट सक्रिय आहेत. या दोन्ही नेत्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर मतभेद असल्याने ते पक्षाच्या कार्यक्रमातही एकत्र येत नसत. एकत्र आले तरी त्यांचे अजिबात जमत नसल्याने पक्षाच्या नेत्यांपुढे गंभीर पेच निर्माण झाला होता.
पक्षातील गटबाजीवर भाजपच्या नेत्यांनी जालीम उपाय केला आहे. राष्ट्रवादीचे दिलीप वाघ यांना पक्षात घेण्यात आले. त्यामुळे आता पक्षाची सर्व सूत्रे वाघ यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे. निमित्ताने भाजपमध्ये वाघ हे नवे सत्ता केंद्र तयार होईल. त्यात पक्षातील गटबाजी असलेले मधुकर काटे आणि अमोल शिंदे यांना वाघ यांच्याशी जुळवून धधघ्यावे लागेल असे सध्याचे चित्र आहे.
यावेळी दिलीप वाघ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वावर ताशेरे ओढले आहेत. म्हणाले गेली २५ वर्ष मी पक्षात होतो. राष्ट्रवादी काँग्रेसने कधीही माझी पाठराखण केली नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांना न्याय देता येत नव्हता. केवळ यामुळेच मी भारतीय जनता पक्षात प्रवेश करीत आहे, असे सांगितले.
दरम्यान पाचोरा मतदारसंघात सातत्याने तीन ते चार उमेदवार विधानसभा निवडणुकीत उमेदवारी करतात. पक्षात गटबाजी असल्याने त्याचा फटका भाजपसह अन्य पक्षांना बसला आहे. झालेल्या निवडणुकीत शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे आमदार किशोर पाटील आणि त्यांच्या भगिनी उद्धव ठाकरे पक्षाच्या वैशाली सूर्यवंशी यांच्यात मुख्य लढत झाली होती. त्यात किशोर पाटील यांनी बाजी मारली. दिलीप वाघ चौथ्या क्रमांकावर राहिले. त्यामुळे आता वाघ यांच्या प्रवेशानंतर भाजप रावेर मतदार संघात प्रबळ होणार आहे.
-----
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.