

Drought Maharashtra: महाराष्ट्रात यंदा भीषण दुष्काळी परिस्थीती आहे. याची आता अनेक रुपं समोर यायला लागली आहेत. त्यानुसार, मध्य प्रदेशच्या सीमेवर महाराष्ट्र आणि राजस्थानच्या मेंढपाळांमध्ये मोठा संघर्ष निर्माण झाल्याचं समोर आलं आहे. मेंढपाळांचे हे गट वर्षभर स्थलांतर करत असतात, त्याच स्थलांतरादरम्यान हा संघर्ष निर्माण झाला आहे. हातात लाठ्या-काठ्या घेऊन ते एकमेकांच्या समोर उभे ठाकले होते, पण काही अघटित घडू नये म्हणून या दोन्ही मेंढपाळांच्या कळपांदरम्यान मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आल्याचं पाहायला मिळालं आहे. पण प्रशासनाच्या मध्यस्थितीमुळं यावर तोडगा काढण्यात आल्याचीही माहिती आहे.
दरवर्षी राजस्थानातील काही मेंढपाळ हे आपल्या मेंढ्यांचे कळप घेऊन महाराष्ट्रातून आंध्र प्रदेशात चरण्यासाठी जात असतात. ते ज्या मार्गातून येतात तो मार्ग महाराष्ट्र (जळगाव, बुलढाणा, अमरावती, अकोला जिल्ह्याचा भाग) मध्य प्रदेशच्या सीमावर्षी भाग आहे. या भागात आल्यानंतर हे राजस्थानातील मेंढ्यांचे कळप महाराष्ट्रातील चारा फस्त करतील अशी भीती महाराष्ट्रातील मेंढपाळांना आहे. त्यामुळं त्यांनी या राजस्थानी मेंढपाळांना बुलढाण्यातील निमखेडी या गावात रोखून धरलं. यामुळं या दोन्ही मेंढपाळांमध्ये मोठा संघर्ष निर्माण झाला. दोन्हीकडील गटांना हातात लाठ्या-काठ्या घेऊन ते एकमेकांविरोधात उभे होते.
सध्या महाराष्ट्रातील सर्वच भागांमध्ये भीषण दुष्काळाची स्थिती आहे. सरकारकडून राज्यातील ३०४ तालुके दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आले आहेत. त्यासाठी शेतकऱ्यांना विविध प्रकारे मदत पुरवली जात आहे. केंद्र सरकारकडेही राज्यानं जवळपास ४५ हजार कोटी रुपयांची मदत मागितली आहे. तसंच जनवारांसाठी चारा छावण्या उभारण्याचाही प्रस्ताव शासनानं ठेवला आहे. दुष्काळामुळं जनावरांचं भरण-पोषणं करणं अगदीच अवघड बनलं आहे. यामध्ये सर्वाधिक चिंता ही गुराखी मंडळी आणि मेंढपाळांना आहे. कारण गुरं आणि मेंढ्या चरणाचा त्यांचा पारंपारीक व्यवसाय आहे. त्यामुळं महाराष्ट्रातील मध्य प्रदेशाच्या सीमेवर राहणाऱ्या विदर्भातील मेंढपाळांनी राजस्थानातून येणाऱ्या मेंढपाळांना यंदा तीव्र विरोध केला आहे.
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विदर्भातील जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आणि स्थानिक प्रशासनानं बाहेरुन राज्यात येणाऱ्या या मेंढपाळांना जिल्हा बंदी केली होती. पण आम्हाला महाराष्ट्रातील दुष्काळाच्या या स्थितीची माहिती नव्हती, नाहीतर आम्ही इथे आलोच नसतो. पण आता महाराष्ट्र सरकारनं आम्हाला पुढे महाराष्ट्र ओलांडून थेट आंध्र प्रदेशात जाण्यासाठी परवानगी दिली आहे, असं सांगत याबद्दल सरकारचे आभार मनले आहेत. एबीपी माझानं यासंदर्भात वृत्त दिलं आहे.
जळगावच्या जिल्हा प्रशासनानं या राजस्थानी मेंढपाळांना जळगाव आणि संग्रामपूर या दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये न थांबता थेट अकोला आणि अमरावती जिह्यात जाण्यास सांगितलं आहे. त्याचबरोबर पुन्हा राजस्थानात आपल्या घरी परतताना देखील त्यांनी या मार्गानं जायचं नाही, अशी लेखी हमी घेतल्यानंतरच त्यांना पुढे जाण्याची परवानगी देण्यात आली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.