
Eknath Khadse news : जळगाव जिल्हा हा महाराष्ट्रातील केळी उत्पादनाचे एक प्रमुख केंद्र आहे. देशात सर्वाधिक केळी पिकवणारा जिल्हा म्हणून जळगावची ओळख आहे. त्यादृष्टीने जिल्ह्यातील नेते विधानपरिषद सदस्य तथा माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जळगाव येथे केळी विकास महामंडळाची स्थापना करावी, अशी मागणी केली आहे.
एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे की, जळगाव येथे झालेल्या कार्यक्रमात तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अस्तित्वात नसलेल्या केळी विकास महामंडळासाठी 100 कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली. केळी उत्पादक शेतकऱ्यांची केलेली ही एकप्रकारे थट्टा आहे. केळी उत्पादकांना कोणतीही सुविधा नाही, सातत्याने केळी पिकावर वेगवेगळे रोग येतात. केळीचे भाव अचानक कमी होतात या सगळ्या बाबींचा विचार करुन तातडीने केळी विकास महामंडळ स्थापनेच्या घोषणेची अंमलबजावणी करावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आमदार एकनाथ खडसे यांनी केली आहे.
मागच्या दहा वर्षांत शासनाने चार ते पाच वेळा केळी विकास महामंडळ स्थापनेबाबत घोषणा केली. अनेक मंत्र्यांनी वेळोवेळी त्यासंदर्भात आश्वासने दिल्याचे खडसेंनी सांगितले. मुक्ताईनगर येथील सुतगिरणीच्या कार्यक्रमावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः महामंडळ स्थापन करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील जळगाव येथे 'शासन आपल्या दारी' या कार्यक्रमात याबाबत घोषणा केली. त्याआधी तत्कालीन कृषी मंत्री दादा भुसे यांनीही महामंडळ स्थापनेचा प्रस्ताव शासनाकडे पाठविल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर तत्कालीन फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांनीही सभागृहात आमदार खडसे यांनी विचारलेल्या प्रश्नावर दोन महिन्यांत केळी विकास महामंडळ स्थापन करण्याचे आश्वासन दिले.
देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली. तरीही जिल्ह्यातील केळी उत्पादकांच्या समस्यांकडे लक्ष दिलेले नाही. त्यामुळे केळी उत्पादक प्रचंड नैराश्यात आहेत. त्याचा परिणाम म्हणून बहुसंख्य केळी उत्पादक शेतकरी नाईलाजास्तव दुसरे पीक घेण्याकडे वळत आहे. केळीच्या भावासंदर्भात सातत्याने होणारे चढ उतार, तसेच भावाच्या अनिश्चितेची समस्या केळी उत्पादकांसमोर आहे. सध्या केळीला अक्षरशः केवळ 400 रुपये क्विंटलचा भाव मिळत आहे. त्यामुळे शेतातील केळीची तोडणी करून ती बाजारात विक्री करण्यासाठी आणणे उत्पादकांना परवडत नाही.
केळी पिकाचा उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणावर आहे. अशातच केळीवर मागील काही वर्षापासून करपा व सीएमव्ही या रोगांचा प्रादुर्भाव होत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे केळीचे पीक वाया जात आहे. यामुळे अक्षरशः रस्त्यावर शेतकऱ्यांना केळी फेकून द्यावी लागत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.