

Former chief minister national politics : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे बिहारचे भावी मुख्यमंत्री कोण असणार, भाजप पुन्हा धक्कातंत्राचा वापर करणार का, अशा चर्चांना उधाण आले आहे. कारण मागील १२ वर्षांत भाजपने विविध राज्यांचे मुख्यमंत्रिपद अनेक नव्या चेहऱ्यांकडे सुपुर्द केले आहे. मात्र, या राजकीय रणनीतीत भाजपने माजी मुख्यमंत्र्यांना नेहमीच खास ट्रीटमेंट दिली आहे. बहुतेक माजी मुख्यमंत्री सध्या देशाच्या राजकारणात सक्रीय आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळात नितीश कुमार हे माजी मुख्यमंत्री होऊन दिल्लीत जाणारे पहिले नेते ठरणार आहेत. त्यामुळे हा मुद्दा सध्या चर्चेला आला आहे. मागील १२ वर्षांत विविध राज्यांतील मुख्यमंत्री बदलण्यात आले आहेत. मोदींच्या पहिल्या कार्यकाळात नोव्हेंबर २०१४ मध्ये याची सुरूवात झाली. गोव्याचे दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर दिल्लीत आणून थेट संरक्षणमंत्री करण्यात आले होते. मात्र, राज्यातील पक्ष मजबूत करण्यासाठी त्यांना पुन्हा गोव्यात आणण्यात आले होते.
छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री रमण सिंग यांना दिल्लीत न आणता विधानसभेचे अध्यक्ष करण्यात आले होते. आसामजे माजी मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्या जागी हेमंता बिस्वा सरमा यांना संधी देण्यात आली. त्यानंतर सोनोवाल थेट केंद्रात मंत्री झाले. मध्य प्रदेशात शिवराज सिंह चौहान, हरियाणामध्ये मनोहर लाल खट्टर यांचे मुख्यमंत्रिपद गेल्यानंतर त्यांनाही केंद्रात मंत्रिपद देण्यात आले.
राजस्थानत माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या ऐवजी भजन लाल यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ टाकण्यात आली. त्यानंतर वसुंधरा राजे यांच्यावर राष्ट्रीय उपाध्यक्षपदाची जबाबदारी टाकण्यात आली. तसेच गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर आनंदीबेन पटेल यांना राज्यपाल करण्यात आले. तर त्यानंतर विजय रुपानी या गुजरातच्याच माजी मुख्यमंत्र्यांना राज्यसभेत पाठविण्यात आले. रुपानी यांचे अहमदाबाद विमान अपघातात निधन झाले आहे.
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा, बसवराज बोम्मई आणि जगदीश शेट्टर यांनाही दिल्लीत नेण्यात आले. बोम्मई आणि शेट्टर हे खासदार असून येडियुरप्पा पक्षाच्या संसदीय मंडळाचे सदस्य आहेत. उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांचा अवघ्या ११४ दिवसांत राजीनामा घेण्यात आल्यानंतर त्यांना दिल्लीत पाचारण करण्यात आले. त्रिपुराचे माजी मुख्यमं६ बिप्लब कुमार देब हेही सध्या खासदार आहेत. त्यांनाही पदाचा राजीनामा द्यावा लागला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.