
Eknath Khadse : कधीकाळी भाजपचे ज्येष्ठ नेते राहिलेले एकनाथ खडसे यांनी भाजप पक्ष सोडल्यानंतर त्यांच्या राजकीय आयुष्याला ओहोटी लागली. जळगाव जिल्ह्यात तयार झालेल्या दुसऱ्या नेतृत्वाने अर्थात गिरीश महाजन यांनी खडसेंची जागा घेतली. त्यानंतर खडसेंना अनेक अडचणींचा मोठा डोंगर पेलावा लागला. त्यातून कसेबसे सावरत असलेले खडसे आता पुन्हा त्यांचा जावई प्रांजल खेवलकर यांच्यामुळे चर्चेतही आले आहेत आणि बदनामही झाले आहेत.
गिरीश महाजन व एकनाथ खडसे या दोन्ही नेत्यांमधील वैर जळगाव जिल्ह्यातच नाही तर महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वश्रुत आहे. दोघेही एकमेकांवर सातत्याने कुठल्या ना कुठल्या प्रकरणावरुन आरोप -प्रत्यारोप करत असतात. ऐकेकाळी एकाच पक्षात राहिलेले दोघेही एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक बनले आहेत. महाजन यांच्यामुळेच मला भाजप पक्ष सोडावा लागल्याचे खडसे सांगतात.
भाजप सत्तेत आहे याची जाण असतानाही खडसे कायमच महाजन यांना शिंगावर घेत आले आहेत. वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये ते सातत्याने महाजन यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करतात. मागेही महाजन यांचे एका महिला आयएएस अधिकाऱ्याशी संबंध आहे असे कथित पत्रकार अनिल थत्ते यांच्या आरोपांचा दाखला देत खडसे यांनी प्रकरण उचलून धरण्याचा प्रयत्न केला. तसेच महाजन यांच्याकडे कोट्यावधींची मालमत्ता कुठून आली असा सवाल करत चौकशीची मागणी खडसेंनी केली.
त्यानंतर आता सध्या राज्यात गाजत असलेल्या हनीट्रॅप प्रकरणातही खडेसेंनी उडी घेतली. त्यातही त्यांनी महाजन यांना लक्ष केलं. हनी ट्रॅप प्रकरणात अटक झालेला प्रफुल्ल लोढा व महाजन यांचे जवळचे संबंध असून याप्रकरणात राजकीय नेतेही आहेत असा आरोप खडसेंनी केला.
प्रफुल्ल लोढा व महाजन यांच्यातील जवळीक व महाजनांचा हनी ट्रॅप प्रकरणात संबंध सिद्ध करण्यासाठी खडसे प्रयत्न करत आहे. याप्रकरणाची एसआयटी चौकशी व्हावी अशी मागणी खडसेंनी लावून धरली आहे. लोढाकडील एका सीडीत महाजन यांच्याशी संबधित माहिती दडल्याचा दावा खडसेंनी केला आहे. गेल्या काही दिवसांपासून याप्रकरणावरुन खडसे -महाजन यांच्यातील वाद टोकाला गेला आहे.
परंतु हनी ट्रॅप प्रकरणात महाजन यांचा संबंध उघड करण्याच्या प्रयत्नात असलेल्या खडसेंपुढे मोठी अडचण निर्माण झाली आहे. त्यांचे जावई प्रांजल खेवलकर यांनाच पुण्यात एका हॉटेलच्या रुममध्ये महिलांसोबत रेव्ह पार्टी करताना पोलिसांनी रंगेहाथ पकडलं आहे. याप्रकरणात त्यांच्या जावयाला अटक झाली आहे.
खडसेंच्या जावयाच्या अडचणी या प्रकरणात आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून खडसे आणि गिरीश महाजन यांच्या वादाने जे टोक गाठलं होतं त्यात आता कुठे तरी खडसे आपली तलवार म्यान करणार की या सगळ्याव मात करत त्वेषाने उसळी मारणार हे पाहावे लागणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.