Assembly election 2024: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेवटच्या क्षणी दिलेल्या उमेदवारांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. या संदर्भात उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षानेही नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे आज याबाबत काय घडामोडी घडतात याची उत्सुकता आहे.
शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाकडून नाशिक जिल्ह्यात दोन उमेदवारांना शेवटच्या क्षणी एबी फॉर्म देण्यात आले. या एबी फॉर्म ची चौकशी निवडणूक आयोगाने सुरू केली आहे. त्याहीपेक्षा गंभीर म्हणजे या संदर्भात महायुतीत मोठी धुसफूस सुरू झाली आहे.
महायुतीचे जागावाटप पूर्ण झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडून नाशिक जिल्ह्यात आठ उमेदवार देण्यात आले आहेत. यातील देवळालीच्या आमदार सरोज अहिरे यांच्या विरोधात शेवटच्या क्षणी निवृत्त तहसीलदार राजश्री अहिरराव यांना शिवसेना शिंदे गटाची उमेदवारी देण्यात आली.
अर्ज दाखल करण्यास काही मिनिटांचा अवधी शिल्लक असताना हे एबी फॉर्म देण्यात आले. दिंडोरी मतदारसंघात विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या विरोधात देखील शिंदे गटाने उमेदवार दिला आहे. माजी आमदार धनराज महाले यांना येथे शिवसेना शिंदे पक्षाने उमेदवारी दिली. या दोन्ही उमेदवारांबाबत स्थानिक उमेदवारांनी तक्रारी केल्या आहेत.
या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी दोन दिवसांपूर्वी चर्चा करण्यात आली. महायुतीच्या संकेतनुसार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाला सोडण्यात आलेल्या जागांवर मुख्यमंत्री शिंदे यांनी दिलेले उमेदवार मागे घेण्याची विनंती करण्यात आली आहे.
शिवसेना मुख्यमंत्री शिंदे गटाने दिलेल्या राजश्री अहिरराव यांची उमेदवारी हा कळीचा मुद्दा बनला आहे. देवळाली मतदारसंघात माजी खासदार हेमंत गोडसे, विजय करंजकर यांसह विविध प्रमुख नेते कार्यरत आहेत. या नेत्यांनी महायुतीचा प्रचार करणे अपेक्षित आहे.
अशा स्थितीत शिवसेना शिंदे गटाने उमेदवार दिल्याने हे नेते महायुतीच्या विरोधात प्रचार करतील. त्याचा फटका महायुतीच्या उमेदवाराला बसण्याची भीती आहे. विशेषतः महाविकास आघाडीच्या उमेदवाराला त्याचा फायदा होऊ शकतो.
या संदर्भात उपमुख्यमंत्री पवार यांनी संबंधितांना आश्वस्त केले आहे. त्यामुळे अर्ज माघारीच्या कालावधीत देवळाली आणि दिंडोरी मतदार संघातील उमेदवारांचे एबी फॉर्म परत घेतले जाण्याची शक्यता आहे. याबाबत देवळाली मतदारसंघात आमदार अहिरे यांच्याकडून पवार यांच्याकडे तक्रार केल्यानंतर राजकीय हालचाली वाढल्या.
या मतदारसंघात सध्या पारंपरिक राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात लढत होत आहे. आमदार अहिरे आणि माजी आमदार योगेश घोलप यांनी देवळाली मतदारसंघात परस्परांविरोधात जोरदार मोर्चा उघडला आहे.
त्यामुळे ही निवडणूक दोन्ही पक्षांसाठी प्रतिष्ठेचा विषय आहे. सध्या मुख्यमंत्री शिंदे गटाचा उमेदवार राहणार की, त्यांचा एबी फॉर्म रद्द होणार, याची उत्सुकता वाढली आहे.
-----