Nashik News: राज्यात महायुतीचे सरकार आले आहे. या सरकारकडे मोठे बहुमत आहे. मात्र भारतीय जनता पक्ष संख्याबळामुळे इतर पक्षांना कोंडीत पकडण्याची शक्यता आहे. त्यामुळे महायुतीतील शिवसेना अन्य पक्षातील माजी नगरसेवकांना आकर्षित करण्यासाठी जोरदार प्रयत्न करीत आहे.
मावळत्या नाशिक महापालिकेत भारतीय जनता पक्षाची स्वबळावर सत्ता होती. या पक्षाचे सत्तरहून अधिक नगरसेवक होते. त्यामुळे महापालिकेचा कारभार करताना त्याचा फायदा झाला. परंतु सध्या या नगरसेवकांना सांभाळताना पदाधिकाऱ्यांना अडचणी येत आहेत.
शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाने महापालिकेची तयारी सुरू केली आहे. मात्र या पक्षाकडे मोजके माजी नगरसेवक आहेत. त्यामुळे अन्य पक्षांतून नगरसेवक फोडण्यासाठी या पक्षाने आक्रमक रणनीती आखली आहे.
त्या दृष्टीने या पक्षाचे पदाधिकारी रोज विविध पक्षांच्या नगरसेवकांना संपर्क करीत आहेत. विधानसभा निवडणुकीत निकालामुळे विरोधी पक्षांतील अनेक नगरसेवकांचे मनोबल घसरले आहे. या नगरसेवकांना विकास निधीचे अमित दाखवून आपलेसे करण्यासाठी शिवसेना शिंदे गटाला काही प्रमाणात यश मिळाले आहे, असे चित्र आहे.
या पार्श्वभूमीवर येत्या आठवड्याभरात शिवसेना शिंदे पक्ष उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला धक्का देण्याची तयारी करीत आहे. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे तीन नगरसेवक शिंदे यांच्या संपर्कात असल्याचा दावा करण्यात आला आहे. यातील सिडकोच्या दोन नगरसेवकांनी त्याला दुजोरा देखील दिला आहे.
शिवसेना शिंदे पक्षाच्या आक्रमक रणनीतीमुळे भारतीय जनता पक्ष ही अस्वस्थ आहे. भारतीय जनता पक्षाकडे असलेल्या माजी नगरसेवकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे या नगरसेवकांना सांभाळण्यासाठी पक्षाचे पदाधिकाऱ्यांना अनेक अडचणी येत आहेत.
राज्यात पक्ष सत्तेवर असला तरी मोठ्या संख्येने माजी नगरसेवक असल्याने त्यांना विकासासाठी शासनाकडून निधी देणे अवघड बनले आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी त्याबाबत पदाधिकाऱ्यांकडे असमर्थता व्यक्त केली आहे. त्याचा फायदा शिवसेना शिंदे पक्षाने घेतला आहे. येत्या आठवड्याभरात आगामी महापालिका निवडणुकीसाठी हा पक्ष अधिक आक्रमकपणे भाजपसह अन्य पक्षाच्या नगरसेवकांना आपल्या पक्षात घेण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
त्यामुळे नाशिक शहरात महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतच राजकीय रस्सीखेच सुरू झाली आहे. त्याचा लाभ महाविकास आघाडी किती घेणार याची उत्सुकता आहे. सध्या तरी महाविकास आघाडीतील घटक पक्षांची तोंडे तीन दिशांना आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.