

Maharashtra Politics : येवला हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते व मंत्री छगन भुजबळ यांचा मतदारसंघ आहे. भुजबळ हे सलग पाचवेळा या मतदारसंघातून निवडून आले आहेत. शिवसेनेचा उमेदवार विरुद्ध राष्ट्रवादीचे छगन भुजबळ अशीच लढत येथे होत आली आहे. मात्र आता शिवसेनेचे विभाजन झाल्यानंतर दराडे बंधूंच्या माध्यमातून एकनाथ शिंदे हे येवल्यात शिवसेनेचा पाया अधिक भक्कम करताना दिसत आहेत.
येवला नगरपरिषद निवडणुकी दरम्यानही शिवेसेनेचे उमेदवार रुपेश दराडे यांच्या निवडणूक प्रचारासाठी एकनाथ शिंदे येवल्यात आले होते. या निवडणुकीत शिवसेनेचा पराभव झाला असला तरी शिवसेना थांबलेली नाही. एकनाथ शिंदे यांनी दराडे बंधूंना हाताशी धरुन येवल्यात शिवसेना अधिक बळकट करण्याचे प्रयत्न सुरु केलेले दिसत आहेत.
त्याचाच भाग म्हणून नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि विविध पक्ष तसेच संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबई येथे उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. शिक्षक आमदार किशोर दराडे, माजी आमदार नरेंद्र दराडे, युवा नेते कुणाल दराडे हे देखील या प्रवेश सोहळ्याला उपस्थितीत होते. दराडे बंधूंच्या पुढाकारातूनच या शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेचा भगवा हाती घेतला. या सगळ्यांचे एकनाथ शिंदे यांनी पक्षात स्वागत केलं. जिल्ह्यात शिवसेनेची ताकद वाढत आहे. जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी कार्यकर्ते पक्षात येत असून पक्षसंघटन मजबूत करून पक्षाची ताकद आणखी वाढवा असे आवाहन एकनाथ शिंदे यांनी केलं.
यांनी केला शिवसेनेत प्रवेश
येथील भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष अमोल शिंदे यांनी पक्षात प्रवेश केला. शिंदे यांनी शिवसेनेत प्रवेश करताच त्यांची उपजिल्हाप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली. याशिवाय येवला मर्चंट बँकेचे उपाध्यक्ष सुभाष गांगुर्डे, पिंपळगाव लेप येथील माजी सरपंच माणिक रसाळ, माजी अध्यक्ष साहेबराव दौंडे, मका व्यापारी शांताराम पगारे, अल्पसंख्याक विकास सोसायटीचे अध्यक्ष शकील पटेल, छावाचे जिल्हा सरचिटणीस अविनाश देशमुख, भटक्या विमुक्त महासंघाचे अध्यक्ष शरद राऊळ, संतोष थोरे, बेबीबाई दौंडे, आदेश दरेकर, आनंद राशीनकर, डॉ. सुजित एलमामे, लखन शिंदे, राहुल क्षीरसागर, संकेत चव्हाण, प्रसाद दरेकर, ऋषिकेश जेऊघाले, गणेश चव्हाण, शाहू जेऊघाले आदींनी शिवसेनेत प्रवेश केला.
येवल्यात आता दराडे बंधू व छगन भुजबळ यांच्यातील संघर्ष वाढलेला आहे. नगरपरिषद निवडणुकीत त्याची झलक पाहायला मिळाली. आगामी निवडणुकांमध्ये भुजबळांना टक्कर देण्यासाठी दराडे बंधू शिवसेनेची ताकद वाढवताना दिसत आहे. हा प्रवेश सोहळा त्याचाच भाग होता. आमदार दराडे बंधूंच्या माध्यमातून पक्षात आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांनी स्वागत केले असून पक्ष वाढवण्यास प्रोत्साहन दिले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.