
Nashik Politics : नाशिक महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला शहरात एकामागून एक मोठे धक्के बसत आहेत. पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर सुधाकर बडगुजर यांनी अनेक मात्तबर नेते व पदाधिकारी यांना सोबत घेऊन भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर ठाकरे गटाला आता दुसरा मोठा धक्का नाशिकमध्ये बसणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून शिवसेना (उबाठा)चे महानगरप्रमुख विलास शिंदे हे शिवसेना(शिंदे गटात) प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. ती चर्चा आता प्रत्यक्षात उतरण्याची दाट शक्यता असून विलास शिंदे हे शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या पुरेपुर तयारीत आहेत. रविवारी हा पक्षप्रवेश ठरल्याची माहिती आहे. आपण नाराज असल्याचं शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं आहे. सहन करण्याची एक क्षमता असते असं ते म्हणाले. आज (दि. २७) त्यासंदर्भात बैठक घेऊन ते अंतिम निर्णय उद्या जाहीर करणार आहेत. विशेष म्हणजे, त्यांच्यासोबत आठ माजी नगरसेवक आणि शेकडो कार्यकर्ते व समर्थकही शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.
सुधाकर बडगुजर यांनी विलास शिंदे यांच्यासह दहा ते बारा जण पक्षात नाराज असल्याचा गौप्यस्फोट केला होता. दरम्यान विलास शिंदे यांनी दोन वेळा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. विलास शिंदे यांच्या लेकीच्या लग्नाला एकनाथ शिंदे खास नाशिकमध्ये आले होते. त्यावेळी शेवटी शिंदे हे शिंदेंकडेच जाणार असे सूचक विधान एकनाथ शिंदे यांनी केलं होतं. त्यापार्श्वभूमीवर अखेर विलास शिंदे हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेत जात असून ते उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत आहेत.
दरम्यान विलास शिंदे यांनी यासंदर्भात माध्यमांनाही प्रतिक्रिया दिली आहे. आपल्याला पक्षात सतत डावललं गेल्याची भावना त्यांनी बोलून दाखवली आहे. ते म्हणाले नवीन जिल्हाप्रमुख म्हणून ज्यांना नेमलं, त्यांच्या मागे कार्यकर्ते नाहीत, तरीही त्यांची नियुक्ती करण्यात आली. विधानसभा निवडणुकीसाठी मी इच्छुक होतो मात्र मला उमेदवारी देण्यात आली नाही. महापौर पदासाठी कधी उमेदवारी मागितली तर ती ही कधी दिली नाही. यासंदर्भात माझी नाराजी मी खासदार संजय राऊत यांच्याकडे बोलून दाखवली होती. मात्र त्यानंतर पंधरा दिवस उलटून गेले तरीही त्यावर काहीच हालचाल झाली नाही, अशी खंत त्यांनी बोलून दाखवली आहे.
महापालिका निवडणुकीच्या तोंडावरच भाजप व शिवसेनेकडून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेना पक्ष पोखरण्याचे काम जोरात सुरु आहे. आजवर अनेक माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांना दोन्ही पक्षांनी गळाला लावलं आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर विलास शिंदे यांचे पक्ष सोडून जाणे हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला परवडणारे नाही. यामुळे निवडणुकीत पक्षापुढील आव्हाने आणखी वाढणार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.