महेश माळवे
Shrirampur News : निवडणुकांचे पडघम वाजायला सुरूवात झाली नाही तोच श्रीरामपुरात राजकीय उलथापालथींनी वेग घेतला आहे. सर्वप्रथम माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी बीआरएसमध्ये प्रवेश करत श्रीगणेशा केला. त्यांच्यानंतर आता काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष संजय छल्लारे शिवबंधन हाती बांधत आहेत, तर युवक काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष अभिजीत लिफ्टे यांनीही पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याने अनेक घडामोडी घडत आहेत.
राष्ट्रवादीला बाय-बाय करत मुरकुटे यांनी गेली जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक लोकसेवा विकास आघाडीच्या माध्यमातून लढविली होती. त्यानंतर त्यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांच्या विकास कामांची त्यांना भुरळ पडल्याने समर्थकांसह बीआरएसमध्ये प्रवेश केला. दुसरीकडे काँग्रेसमध्ये आमदार लहू कानडे व माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे गटामध्ये निर्माण झालेली दुफळी माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी शिष्टाई करूनही मिटली नाही. माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांचेही प्रयत्न अयशस्वी झाले.
शहराध्यक्षाचा मुद्दा गेल्या दोन वर्षांपासून भिजत पडला होता. याप्रश्नी छल्लारे यांनी थोरात, तांबे, तसेच काँग्रेसचे निरीक्षकांकडे पाठपुरावा केला. मात्र, त्यावर तोडगा काढण्याऐवजी तो भिजत ठेवण्यातच त्यांनी धन्यता मानली. त्यामुळे छल्लारे यांनी काँग्रेसला जय महाराष्ट्र करत शिवबंधन बांधण्याचे निश्चित केले. येत्या बुधवारी (ता.२३) त्यांचा 'मातोश्री'वर प्रवेश होणार आहे. यासाठी त्यांनी जय्यत तयारी केली आहे. ह्या घडामोडीबरोबरच युवक काँग्रेसचे (Congress) माजी अध्यक्ष अभिजीत लिफ्टे यांनीही कानडे व ससाणे यांच्या गटबाजीला वैतागून पक्षाला रामराम केल्याचे जाहीर केले.
रविवारी (ता.२०) आमदार थोरात यांच्या दालनात श्रीरामपुरातील तालुका व शहराध्यक्ष पदाच्या निवडीसंदर्भात चर्चा झाली. तालुकाध्यक्ष अरुण नाईक यांची फेर निवड, तर शहराध्यक्ष पदासाठी ससाणे गटाने माजी उपनगराध्यक्ष अण्णासाहेब डावखर यांचे नाव पुढे केले होते. मात्र, या नावाला कानडेंकडून विरोध झाल्याचे समजते. या निवडीमुळे पुन्हा वाद उफाळून आल्याने त्या तूर्त मागे ठेवण्यात आल्या आहेत. दुसरीकडे छल्लारे यांच्या मतपरिवर्तनासाठी माजी नगराध्यक्ष संजय फंड यांच्या निवासस्थानी ससाणे गटाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. छल्लारे शिवसेना प्रवेशावर ठाम राहिल्याने त्यांच्या रूपाने ससाणे गटाचा एक बुरुज ढासळल्याचे बोलले जात आहे.
भाजपमध्ये खांदेपालट शक्य
राजकीय उलथापलथ सुरू झाली, असताना काँग्रेस पाठोपाठ भाजपमध्येही (BJP) याचे लोण गेल्यास आश्चर्य वाटायला नको. आगामी पालिका निवडणुकीच्या रणनितीचा भाग व शहरातील वातावरण पाहता भाजपच्याही प्रमुख पदाधिकाऱ्यांची खांदेपालट होण्याची शक्यता काही राजकीयधुरणांनी खासगीत बोलताना व्यक्त केली आहे.
Edited by : Amol Jaybhaye
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.