

Nashik Guardian Minister : नाशिकच्या राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. नाशिकच्या पालकमंत्रीपदावर कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य शासनाने नाशिकचे पालकमंत्री म्हणून गिरीश महाजन यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली आहे.
नाशिकसह रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा देखील सुटला आहे. शिवसेनेचे भरत गोगावले यांची रायगडच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यासंदर्भात राज्य सरकारने परिपत्रक जारी केले आहे.
राज्यातील फडणवीस सरकारला दीड वर्षाहुन अधिक काळ लोटला. मात्र, नाशिक व रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा सुटलेला नव्हता. दोन्ही जिल्हे पालकमंत्री विनाच होते. मात्र, फडणवीस सरकारने अखेर दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची घोषणा केली आहे. नाशिकमध्ये कुंभमेळा मंत्री असलेल्या गिरीश महाजन यांनाच पालकमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. नाशिकच्या पालकमंत्रीपदासाठी इच्छुक असलेल्या मंत्री छगन भुजबळ व दादा भुसे यांना डच्चू मिळाला आहे.
महायुती सरकार स्थापन झाल्यापासून नाशिकच्या पालकमंत्रीपदावरुन शिवसेना व भाजपमध्ये वाद होता. त्यात राष्ट्रवादीचे जिल्ह्यात सर्वाधिक आमदार असल्याने राष्ट्रवादीलाही पालकमंत्रीपद हवे होते. शिवसेनेकडून दादा भुसे तर राष्ट्रवादीकडून मंत्री छगन भुजबळ हे पालकमंत्रीपदासाठी इच्छुक होते. दादा भुसे यांना डावलण्यात आल्याने शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली होती. त्यातूनच वाद निर्माण होऊन मंत्री गिरीश महाजन यांचे जाहीर केलेले पालकमंत्रीपद रद्द करण्याची नामुष्की सरकारवर आली होती. या वादामुळे तब्बल दीड वर्ष पालकमंत्रीपदाचा निर्णय रखडला होता.
दरम्यान, सिंहस्थ कुंभमेळ्यावर आधारित असलेल्या सिंहस्थ कुंभपर्व या पुस्तिकेत मंत्री गिरीश महाजन यांचा उल्लेख पालकमंत्री असा करण्यात आल्याने राजकीय चर्चांणा उधाण आलं होतं. काल त्यावरुन नाशिकच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली होती. हा उल्लेख चुकून झाला की राजकीय संकेत होता यावरुन तर्क-वितर्क लढवले जात होते.
अखेर ती चूक नव्हती तर तो राजकीय संकेत होता हे स्पष्ट झालं आहे. आता नाशिकच्या पालकमंत्रीपदावर अधिकृतपणे मंत्री गिरीश महाजन यांची नियुक्ती करण्यात आल्याने मंत्री दादा भुसे व छगन भुजबळ या दोघांची काय भूमिका राहते हे बघावे लागणार आहे.
मंत्री दादा भुसे व छगन भुजबळ हे या नियुक्तीला विरोध करतात की आपली तलवार म्यानातच ठेवतात हे पाहावे लागणार आहे. काही दिवसांपूर्वी शहरात ठिकठिकाणी छगन भुजबळ यांना पालकमंत्री करा असे फलक लागले होते. मात्र, त्यावर भुजबळांनी नाराजी व्यक्त करत आपल्या कार्यकर्त्यांना ते फलक हटवण्याचे आदेश दिले होते. तेव्हाच भुजबळांनी आपली तलवार म्यान केल्याचे संकेत मिळाले होते. त्यानंतर स्वातंत्र्यदिनानिमित्त शासकीय ध्वजारोहणाचा मानही मंत्री गिरीश महाजन यांनाच मिळाला होता.
नाशिकमध्ये सध्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू आहेत. रस्ते, वाहतूक व्यवस्था, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य सुविधा तसेच भाविकांसाठी आवश्यक पायाभूत सुविधांची कामे वेगाने सुरू आहेत. मात्र, अनेक कामे अर्धवट असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. शहरातील रस्त्यांवरील खड्डे आणि खोदकामाचा मुद्दाही गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. विरोधकांनी त्यावरुन महाजनांना टार्गेट केलं आहे.
या पार्श्वभूमीवर गिरीश महाजन यांच्याकडे पालकमंत्रीपदाची जबाबदारी आल्याने त्यांच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.