Jalgaon News: नाशिक जिल्ह्यात पक्षातील बंडखोरी समविण्यासाठी भाजप नेते गिरीश महाजन यांनी धावपळ केली. त्यात ते काही प्रमाणात यशस्वी झाले. मात्र `संकट मोचक` महाजन यांच्या स्वतःच्या जळगाव जिल्ह्यातच बंडखोरांमुळे भाजप संकटात सापडला आहे.
जळगाव जिल्ह्यातील अकरा ११ पैकी दहा जागा भारतीय जनता पक्षाच्या महायुतीकडे आहेत. रावेर या एकमेव मतदार संघात काँग्रेसचे शिरीष चौधरी हे आमदार आहेत. उर्वरित दहा जागांवर मुक्ताईनगर येथील अपक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह सर्वच आमदार महायुती सरकार सोबत आहेत.
आता चंद्रकांत पाटील हे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आहेत. मंत्री अनिल भाईदास पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे आहेत. उर्वरित भाजप आणि शिवसेना शिंदे गटाकडे प्रत्येकी चार असे आठ आमदार आहेत.
त्यामुळे हे संख्याबळ टिकविण्यासाठी महायुतीला प्रचंड परिश्रम घ्यावे लागणार आहेत. यामध्ये आता बंडखोरीचा मिठाचा खडा पडला आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाला बंडखोरांच्या आव्हानाने चांगलेच घेरले आहे.
जळगावच्या चार मतदारसंघांमध्ये मोठ्या प्रमाणावर बंडखोरी झाली आहे. यामध्ये जळगाव शहरात भारतीय जनता पक्षाचे आमदार राजू मामा भोळे उमेदवार आहेत. त्यांच्या विरोधात भाजपचे माजी महापौर अश्विन सोनवणे यांनी अपक्ष उमेदवारी केली आहे.
दुसरे माजी महापौर कुलभूषण पाटील यांनीही बंडखोरी केली आहे. शिवसेनेच्या माजी महापौर जयश्री महाजन यादेखील अपक्ष उमेदवार आहेत. एकंदरच तीन माजी महापौर अपक्ष उमेदवारी करीत असल्याने ही बंडखोरी गांभीर्याने घ्यावी लागेल.
पाचोरा मतदार संघात गेल्या निवडणुकीप्रमाणे यंदाही चौरंगी लढत होत आहे. त्यात भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी बंडखोरी केली आहे. दिलीप वाघ आणि प्रताप हरी पाटील हे बंडखोर देखील रिंगणात आहेत. त्यामुळे महायुतीचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली.
पाचोरा मतदारसंघात आमदार पाटील यांना घरातूनच मोठा विरोध आहे. त्यांच्या भगिनी वैशाली सूर्यवंशी यांना शिवसेना ठाकरे पक्षाने उमेदवारी दिली आहे. त्यामुळे गेल्या निवडणुकीत अवघ्या दोन हजार मतांनी विजयी झालेल्या आमदार पाटील यांना निवडणूक सोपी राहिलेली नाही.
एरंडोल मतदार संघात शिवसेना शिंदे पक्षाचे आमदार चिमणराव पाटील यांचा मुलगा हर्षल उमेदवार आहे. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे डॉक्टर सतीश पाटील उमेदवार आहेत. येथे भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार ए. टी. पाटील तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे डॉ संभाजीराव पाटील आणि अमित पाटील यांनी बंडखोरी केली आहे.
या मतदारसंघात शिवसेना ठाकरे पक्षाचे डॉक्टर हर्षल माने हे देखील अपक्ष उमेदवार आहेत. त्यामुळे महायुतीचे हर्षल पाटील आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सतीश पाटील दोघेही बंडखोरांशी सामना करीत आहेत.
मंत्री गिरीश महाजन हे जामनेर मतदार संघातून सातव्यांदा उमेदवारी करीत आहेत. त्यांच्या विरोधात पक्षातील बंडखोर उमेदवार नाही. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने भाजपच्याच जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे यांना उमेदवारी देऊन महाजन यांची अडचण वाढविली आहे. सध्या धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशा स्वरूपाचा प्रचार मंत्री महाजन यांचे विरोधक या मतदारसंघात करीत आहेत.
मंत्री महाजन भारतीय जनता पक्षाचे "संकट मोचक" म्हणून ओळखले जातात. विविध अडचणीच्या आणि राजकीय समस्यांच्या निराकरणासाठी पक्ष त्यांच्यावर जबाबदारी देत असतो. मात्र मंत्री महाजन आपल्याच जिल्ह्यातील बंडखोरांना थोपवू शकलेले नाही. अशा परिस्थितीत 11 पैकी दहा जागा राखण्याच्या आव्हानावर ते कशी मात करतात याची उत्सुकता आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.