

Jalgaon Politics : जळगाव महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने संघटनात्मक बांधणीला गती देत महत्त्वाच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. मंत्री गिरीश महाजन यांचा उजवा हात समजले जाणारे चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांना मनपा निवडणुकीसाठी प्रभारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. तर आमदार सुरेश भोळे (राजुमामा) यांना निवडणूक प्रमुखाची जबाबदारी देण्यात आली आहे.
प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी निवडणुकीसाठी प्रभारी म्हणून आमदार मंगेश चव्हाणांची नियुक्ती केल्याने भोळे समर्थकांमध्ये नाराजी पसरल्याचे चित्र आहे. मंगेश चव्हाणांनी लक्ष घातले तर, आमदार राजूमामांच्या समर्थकांवर अन्याय होईल, अशी भावना त्यांच्यात आहे. त्यामुळे भाजपच्या अंतर्गत गोटात प्रचंड अस्वस्थता पसरली आहे.
मंगेश चव्हाण हे गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय आहे. याशिवाय आमदार चव्हाण यांनी यापूर्वी लोकसभा तसेच विविध नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये पक्षाची जबाबदारी यशस्वीरीत्या सांभाळली आहे. त्यांच्या अनुभवावर विश्वास ठेवत भाजप नेतृत्वाने जळगाव महापालिकेसाठीही त्यांच्यावरच निवडणूक प्रभारी म्हणून जबाबदारी सोपवली आहे.
जळगाव महापालिकेची निवडणूक तब्बल सात वर्षांच्या कालावधीनंतर होत आहे. त्यामुळे जळगाव महापालिकेवर एकहाती सत्ता मिळविण्यासाठी भाजपने रणनीती आखली असून आमदार चव्हाण यांच्या खांद्यावर आता प्रमुख जबाबदारी असणार आहे. जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे यांच्याकडे निवडणूक प्रमुखपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्यावरही तितकीच जबाबदारी असणार आहे.
लढ्ढांनी मुलाखत घेतल्याने नाराजी
भाजपने दोन दिवसांपूर्वी महापालिकेसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. परंतु भाजपमध्ये नुकतेच दाखल झालेले नितीन लढ्ढा हेही मुलाखत घेणाऱ्यांमध्ये होते. त्यामुळे भाजपच्या निष्ठावंतांनी नाराजी व्यक्त केली आहे. ज्यांच्या विरोधात वर्षानुवर्षे लढलो, संघर्ष केला तेच आमच्या मुलाखती घेत असतील तर काय करायचे असा प्रश्न काही उमेदवारांनी उपस्थित करत आपली नाराजी व्यक्त केली.
राजूमामा म्हणतात आक्षेप घेण्याचे कारण नाही
दरम्यान आमदार मंगेश चव्हाण यांच्या निवडणूक प्रभारी म्हणून झालेल्या नियुक्तीवर विचारले असता त्यावर आक्षेप घेण्याचे अथवा त्यातून चुकीचा अर्थ काढण्याचे कारण नाही असे आमदार राजूमामा भोळे यांनी म्हटले आहे.
कोणत्याही प्रकारच्या निवडणुकीसाठी पक्षाकडून प्रभारी, निरीक्षक नेमण्याची रचना आधीपासूनच पक्षात आहे. त्या रचनेचा भाग म्हणून मंगेश चव्हाण यांची प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असल्याचं ते म्हणाले. मी पक्षाचा कार्यकर्ता असून लोकसभा व विधानसभेला रिझल्ट दिला आहे. पक्षाचे काम प्रमाणिकपणे करणे हेच आपले कर्तव्य आहे अशी प्रतिक्रिया आमदार सुरेश (राजूमामा) भोळे यांनी दिली.
२०१८ मध्ये गिरीश महाजन हे पालकमंत्री होते. त्यांच्या नेतृत्वात महापालिका निवडणूक झाली होती. त्यात भाजपने चांगली कामगिरी करीत ७५ पैकी ५७ नगरसेवक निवडून आणले होते. सुरेशदादा जैन यांच्या सत्तेला सुरुंग लावत सत्ता स्थापन केली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.