Girish Mahajan News : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकण्यासाठी भाजपने निर्धार केला आहे. जळगाव जिल्ह्यात पक्षाचे पदाधिकारी त्यासाठी कामाला लागले आहेत. यासंदर्भात नुकतीच पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची कार्यशाळा झाली.
जळगाव जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकण्याचा निर्धार प्रत्येकाने केला पाहिजे, असे आवाहन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना केले आहे. भाजप या निवडणुकांसाठी कोणतीही रिस्क घेण्यास तयार नाही. त्यामुळे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सातत्याने सक्रिय ठेवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्रातील सरकारला अकरा वर्ष पूर्ण झाली आहेत. निमित्ताने जळगाव जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची कार्यशाळा झाली. त्यावेळी बोलताना महाजन यांनी आगामी निवडणुका भाजपने स्वबळावर आणि महायुती म्हणून देखील शंभर टक्के जिंकण्याचा निर्धार केला आहे. त्यासाठी जेष्ठ पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी मेहनत घेतली पाहिजे. तरुणांना पक्षात जोडले पाहिजे. तरुणांना पक्ष आगामी निवडणुकांमध्ये संधी देईल. पक्ष विस्तारासाठी सातत्याने नव्या लोकांना भाजपशी जोडण्याचे काम प्रत्येकाने करावे, असे सांगितले.
स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षात कोणत्याही प्रकारची गटबाजी असता कामा नये. पक्षात गटबाजीला अजिबात थारा दिला जाणार नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उमेदवारी देण्यापासून तर निवडणुकांच्या प्रचारापर्यंत सगळीकडे एकोप्याने काम झाले पाहिजे. कोणीही गटबाजी केली तर त्याला योग्य ती जागा दाखविली जाईल, असा इशारा यावेळी महाजन यांनी दिला.
विविध नगरपालिका आणि जिल्हा परिषदेत भारतीय जनता पक्षात नेत्यांची संख्या आणि इच्छुक अधिक आहेत. उमेदवारी देताना पक्षाला सावध पावले टाकावी लागणार आहेत.या पार्श्वभूमीवर गटबाजी बाबत मंत्री महाजन यांचा इशारा नेमका कोणाला? अशी चर्चा या कार्यशाळेनंतर सुरू झाली.
जळगाव महापालिकेत शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाची सत्ता होती. त्याचा अपवाद वगळता जळगाव जिल्ह्यातील बहुतांशी नगरपालिका आणि जिल्हा परिषद तसेच पंचायत समित्यांवर भाजपचे वर्चस्व आहे. राज्यात महायुतीचे सरकार असल्याने हे वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी गिरीश महाजन यांनी विडा उचलला आहे. दरम्यान कार्यशाळेतआमदार सुरेश भोळे, जिल्हा अध्यक्ष डॉ राधेश्याम चौधरी, अजय भोळे, नंदकिशोर महाजन, अशोक कांडेलकर, उज्वला बेंडाळे, ज्ञानेश्वर पाटील, डॉ केतकी पाटील, राकेश पाटील अशा विविध नेत्यांनी निवडणुका जिंकण्यासाठी स्थानिक राजकीय परिस्थितीची माहिती दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.