Nashik MLC Election: आमदार, खासदार फोडण्यापासून तर लहान सहान निवडणुकीतही एकनाथ शिंदे अफाट लक्ष्मीदर्शनाचा फंडा वापरत असल्याचा आरोप होत आला आहे. विधानसभा निवडणुकीत नाशिकच्या देवळाली मतदारसंघात निवडणूक आयोगाची झालेली कारवाई बोलकी होती. मात्र विधान परिषद निवडणुकीत शिंदे यांचे हे तंत्र बूमरॅंग झाल्याचे स्पष्ट झाले.
विधानपरिषद निवडणुकीत नाशिक आणि जळगाव या दोन्ही जागांची जबाबदारी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्यावर होती. या दोन्ही जागांवर भाजपने दावा केला होता. मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यासाठी जंग जंग पछाडून नाशिकची जागा पदरात पाडून घेतली.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून येणाऱ्या नेत्याला तेच पद देण्याचा नियम एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आहे. नरेंद्र दराडे हे ठाकरेंच्या शिवसेनेतून स्थानिक स्वराज्य संस्थेचे आमदार होते.
ठाकरेंच्या पाठिंबावरच त्यांचे बंधू किशोर दराडे आमदार झाले होते. मात्र शरीराने ठाकरे पक्षात आणि मनाने शिंदेंकडे असे त्यांचे धोरण होते. त्यात दबाव आल्यावर दराडे शिंदेंच्या यांच्या शिवसेनेत गेले.
नरेंद्र दराडे आमदार असले तरी राजकीय वकूब आणि कामकाज म्हणून नाशिकच्या राजकारणावर त्यांचा काहीही प्रभाव राहिला नव्हता. जिंकण्याचे लक्ष्मी दर्शनाचे तंत्र ही त्यांची रुळलेली शैली होती. त्यामुळे निवडून आल्यावर मतदारांची संपर्क न ठेवणे किंबहुना मतदारांची उपेक्षा करणे, हाच प्रकार गेली काही वर्ष सुरू होता. त्याचे पडसाद या निवडणुकीत उमटले.
नरेंद्र दराडे यांची उमेदवारी चुकली हा संदेश पक्षातील नेत्यांनीही उपमुख्यमंत्री शिंदे यांना दिला होता. मात्र त्यात दुरुस्ती करण्याऐवजी त्यांनी भाजपच्या बंडखोरांना माघार घेण्यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यावर जबाबदारी सोपवली. मंत्री सामंत, शिक्षणमंत्री दादा भुसे आणि भाजपचे गिरीश महाजन या तीन मंत्र्यांनी त्यासाठी दिवस-रात्र प्रयत्न करून सुरुवातीला गणेश गीते आणि नंतर गोकुळ गीते यांना शांत केले.
उमेदवाराला शांत केले तरीही गोकुळ गीते यांनी जाहीरपणे नरेंद्र दराडे यांना पाठिंबा देण्यास नकार दिला. मी प्रचार करणार नाही एवढेच सुचक विधान करून ते शांत बसले. यामध्येच खरी मेख होती, हे शिवसेना शिंदे पक्षाच्या दराडे यांना उमगण्यास निकालाची तारीख यावी लागली.
या निवडणुकीत अपक्ष गोकुळ गीते यांनी शांत बसण्यासाठी शिंदे यांच्याकडून जे काही मिळाले ते शिंदे यांच्या विरोधातच मतदारांमध्ये वापरले. मतदानाच्या दोन दिवस आधी प्रत्येक मतदाराकडे गीते यांचे गिफ्ट पोहोचले होते. त्यावेळी महायुतीचे चारशेहून अधिक मतदार शरीराने महायुतीसोबत आणि मनाने दराडे यांच्या विरोधात असे चित्र दिसले.
विधानपरिषदेची ही निवडणूक अत्यंत खर्चिक आणि महागडी ठरली आहे. त्यामध्ये दोन्ही उमेदवारांकडून प्रचंड प्रमाणात पदरमोड झाली आहे. त्यात राजकारणातील कमाई नरेंद्र दराडे यांनी राजकारणातच गमावली. मात्र आर्थिक दृष्ट्या सक्षम असल्याने अजूनही पुढच्या राजकारणात ते काय भूमिका घेतात याची उत्सुकता कायम राहील.
विधानपरिषद निवडणुकीत अपक्ष गोकुळ गीते विजयी झाले आहे. अपक्ष असले तरी ते कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या शब्दापुढे जाणार नाही हे वेगळे सांगण्याची गरज नाही. त्यामुळे या निकालाचा अर्थ एकनाथ शिंदे हरले आणि महायुती जिंकली असाही निघू शकतो. किंबहुना गीते हे विना विलंब गिरीश महाजन यांचा आशीर्वाद घेण्यास जातील यात कोणतीही शंका राहिलेली नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.