
Nashik News : नाशिकच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे. आगामी स्थानिक स्वराज्या संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप व एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने मिळून नाशिकमध्ये उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला पूरतं खिळखिळं केलं आहे. परंतु आता ठाकरेंपाठोपाठ एकनाथ शिंदेंनाच भाजप मोठा धक्का देण्याच्या तयारीत असल्याचं दिसत आहे. कारण शिवसेना (शिंदे गट) तील माजी खासदार हेमंत गोडसे हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे.
नाशिकमध्ये सत्तासमीकरण जुळवण्यासाठी भाजप व शिंदे गटात असलेली रस्सीखेच काही लपून राहिलेली नाही. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील नेते आपल्या गळाला लावताना या दोन्ही पक्षांमध्ये मोठी स्पर्धा पाहायला मिळाली. परंतु आता महायुतीमधील या दोन्ही महत्वाच्या घटक पक्षांमध्येच मोठा भूकंप होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. कारण माजी खासदार हेमंत गोडसे काही माजी नगरसेवकांसह भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात बोलले जात आहे.
दरम्यान या चर्चांवर स्वत: हेमंत गोडसे यांनी खुलासा केला आहे. मी भाजपात जाणार असल्याच्या चर्चा दोन ते तीन दिवसांपासून सुरु आहेत. मात्र मी पक्षातच आहे असं गोडसे यांनी म्हटलं आहे. परंतु गोडसे यांनी जरी इन्कार केला असला तरी प्रत्यक्षात तसे झाल्यास त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेला शहरात मोठा धक्का बसू शकतो.
शिवसेनेत फूट पडल्यानंतर हेमंत गोडसे हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेले. नाशिकमधून त्यांना २०२४ मध्ये खासदारकीला उमेदवारी मिळाली. परंतु शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी त्यांना पराभूत केलं. यापूर्वी ते सलग दोन वेळा नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडून आले होते. २०१४ साली त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार समीर भूजबळ आणि २०१९ साली राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचा त्यांनी पराभव केला होता.
मात्र, 2024 च्या लोकसभेत हेमंत गोडसे यांचा पराभव झाला असला तरी नाशिकमध्ये त्यांचे मोठे वलय आहे. त्यामुळे गोडसे भाजपमध्ये गेल्यास भाजपची ताकद वाढेल आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसाठी तो फार मोठा धक्का असेल. भाजपला नाशिक महापालिका कोणत्याही स्थितीत जिंकायची आहे. त्यासाठी भाजपने शंभर प्लसचा नारा दिला आहे. त्यामुळे भाजप विरोधी पक्षातील अनेक मोठे मासे गळाला लावत आहे, परंतु इथे गोडसे हे मित्रपक्ष असलेल्या शिंदेंच्या शिवसेनेतून भाजपमध्ये येत असल्याने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.