Hiraman khoskar News: काँग्रेस आमदार हिरामण खोसकर वारंवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटतात. हा आता चर्चेचा विषय नसून संतापाचा विषय झाला आहे. यावर स्थानिक काँग्रेसने त्यांनी खोसकर यांना चांगलेच झापले आहे.
इगतपुरीचे काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर (Hiraman Khoskar) गेल्या महिनाभरात दोन वेळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटले. यावर ते मतदारसंघातील कामांसाठी भेटलो, असा दावा करतात. मतदारसंघाच्या विकासासाठी मी मुख्यमंत्र्यांना भेटायचे नाही का? असा प्रश्न त्यांनी केला होता.
यावर स्थानिक पदाधिकाऱ्यांनी त्यांना सडेतोड उत्तर दिले आहे.मतदारसंघातील कार्यकर्ते आणि जनता अडाणी नाहीत. त्यांना सर्व राजकारण कळते. महाराष्ट्रातील काँग्रेसचे खोसकर हे एकमेव आमदार मतदारसंघासाठी काम करतात का की, त्यांना वारंवार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना भेटावे लागते.
राज्यातील काँग्रेसचा अन्य एकही आमदार मुख्यमंत्र्यांना असा भेटत नाही. म्हणजे ते आमदार मतदारसंघासाठी काम करीत नाहीत का? असा संतप्त सवाल काँग्रेसच्या (Congress) वरिष्ठ पदाधिकार्यांनी केला आहे.
काँग्रेसच्या अन्य आमदारांना आपल्या मतदारांची काळजी नाही का? रोज मुख्यमंत्र्यांना भेटून खोसकर इगतपुरीमध्ये असा कोणता मोठा प्रकल्प आणणार आहे? असा प्रश्नही या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
आमदार खोसकर वारंवार मुख्यमंत्र्यांना भेटत असल्याने त्यांची उमेदवारी संकटात आहे, हा संदेश मतदारसंघात गेला आहे. त्यामुळे अनेक इच्छुक तयार झाले आहेत. जवळपास १३ इच्छुकांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे.
अनेक इच्छुक शिष्टमंडळांसह पदाधिकाऱ्यांची भेट घेत आहेत. त्यामुळे इगतपुरी मतदारसंघात विधानसभा निवडणुकीच्या राजकीय हालचालींना वेग आला आहे. या निमित्ताने नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.
इगतपुरीचे गोपाळ लहामगे यांनी दोन दिवसांपूर्वी आपल्या समर्थकांसह पक्षाचे जिल्हाध्यक्ष शिरीष कोतवाल आणि वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली. याशिवाय उषाताई बेंडकोळी, शरद तळपाडे, राष्ट्रीय धावपटू कविता राऊत, माजी सभापती अनिता घारे, लकी जाधव, अनिल डगळे, डॉ रघुनाथ भोये, संतोष ठाकूर अशा तेरा इच्छुकांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे.
संसदीय मंडळ या संदर्भात कोणाला उमेदवारी द्यावी, याचा निर्णय घेईल. एकंदरच आमदार खोसकर यांनी क्रॉस वोटिंग करून स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतला आहे. त्यांचे ते डावपेच अंगलट आले आहेत.
काँग्रेसने आमदार खोसकर यांच्या नावापुढे उमेदवारीसाठी फुली मारली आहे. आता आमदार खोसकर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाकडून उमेदवारीसाठी प्रयत्नशील आहे. महायुतीकडून इगतपुरी मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाला सोडावा यासाठी प्रयत्न आहेत. तसे झाल्यास आमदार खोसकर हे महायुतीचे उमेदवार होतील.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.