Shrirampur News : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस इच्छुकांच्या मुलाखती आज शिर्डी इथं झाल्या. काँग्रेस आमदार लहू कानडे आणि करण ससाणे समर्थक समारोसमोर आल्याने जोरदार घोषणाबाजी झाल्याने गोंधळ उडाला. पक्ष निरीक्षकांसमोर समोर हा सर्व राडा सुरू होता.
या वादावर कानडे यांनी पक्षाच्या लोकप्रतिनिधीची बदनामी करणारे पक्षाचे कार्यकर्ते नसतात. त्यांनी मुखवटा धारण केलेला असतो. त्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष केलेले बरे. इच्छुक उमेदवार हेमंत ओगले यांनी लोकप्रतिनिधींनी पाच वर्षात विकासाला खीळ लावल्याची प्रतिक्रिया दिली. भविष्यात हा वाद अजून चिघळण्याचे संकेत यानिमित्ताने मिळाले आहेत.
विधानसभा निवडणुकीला इच्छुक असणाऱ्या उमेदवारांच्या काँग्रेसकडून मुलाखती शिर्डी (Shirdi) इथं एका रिसॉर्टमध्ये घेण्यात आल्या. पक्षनिरीक्षक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष आमदार मुजफ्फर हुसैन, जिल्हाध्यक्ष जयंत वाघ, आमदार लहू कानडे, तालुकाध्यक्ष अरुण नाईक, जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे, सभापती सुधीर नवले, सचिन गुजर आदी उपस्थित होते. मुलाखतीवेळी कानडे आणि ससाणे समर्थक समोरासमोर आले. गेल्यावेळी अन्य पक्षाच्या उमेदवारासोबत असणारे आज लोकप्रतिनिधींसमवेत असल्याचा आरोप करत ससाणे आणि हेमंत ओगले समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. आमदार कानडे समर्थकांनीही त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले श्रीरामपुरातील काँग्रेसअंतर्गत गटबाजी चांगलीच चव्हाट्यावर आली.
आमदार कानडे म्हणाले, "पक्ष निरीक्षकांसमोर काँग्रेसच्या (Congress) मुलाखती सुरू होत्या. यावेळी ज्यांनी गोंधळ घातला, त्याला याची कारणे विचारली पाहिजे. त्यांची उत्तरे मी कशी देऊ शकतो. पक्षाच्या लोकप्रतिनिधीची बदनामी करतात, ते पक्षाचे कार्यकर्ते नसतात. ते मुखवटा घेऊन पक्षाचे आहेत असे दाखवतात. यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष केलेले बरे. निवडणुका जाहीर झाल्यानंतर पावसाळ्यातल्या छत्र्याप्रमाणे उगवणाऱ्या लोकांनी, जर 17 वर्षे मतदारसंघात राहून येथील जनतेसाठी काय दिले, याचे उत्तर दिले पाहिजे". आपल्या सोबत असलेले कार्यकर्ते असल्या थिल्लर गोष्टी करताना दिसणार नाहीत. मी कोणालाही विरोध केला नसून सर्वांना सोबत घेऊन चाललो आहे, असे आमदार कानडे यांनी म्हटले.
हेमंत ओगले म्हणाले, "मी काँग्रेसकडून उमेदवारी मागत आहे. आज कार्यकर्ते समोरासमोर आल्यानंतर घोषणाबाजी होणे हे साहजिकच होते. विद्यमान आमदारांनी पाच वर्षात काहीच काम केले नाही. संघटनेबरोबर न राहता जे विरोधात काम करत होते, त्या सर्वांना बरोबर घेतले. पाच वर्षात विकास कामांना खीळ घातली.त्याचा राग मतदारसंघांमध्ये प्रचंड प्रमाणात आहे". यावेळी पक्ष संघटना पूर्णपणे आपल्याबरोबर असून नगरसेवक, पंचायत समिती, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत, सोसायटीचे सदस्य, प्रमुख काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, सेवादल या सर्व संघटना आपल्या सोबत असल्याचा दावा हेमंत ओगले यांनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.