

- उमेश मोरगावकर
IPS Mahesh Bhagwat : अहिल्यानगरमधील पाथर्डी तालुक्याचे सुपुत्र व ज्येष्ठ आयपीएस अधिकारी महेश भागवत यांची तेलंगणा राज्याच्या पोलिस महासंचालकपदी (कायदा आणि सुव्यवस्था) निवड झाली आहे. पोलिस महासंचालक पदावर नियुक्ती झालेले ते अहिल्यानगर जिल्ह्यातील दुसरे अधिकारी आहेत.
भागवत हे १९९५ बॅचचे आयपीएस अधिकारी आहे. याआधी ते तेलंगणा राज्यात कायदा व सुव्यवस्था विभागाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक या पदावर कार्यरत होते. त्यापूर्वी साडेसहा वर्षे हैदराबादच्या शिवार प्रांतातील राचकोंडा पोलिस आयुक्तालयाचे प्रथम पोलिस आयुक्त म्हणूनही ते कार्यरत होते.
भागवत यांनी आजपर्यंतच्या सेवेत नक्षलवाद्यांच्या विरोधातील अनेक कारवायांचा सहभाग घेतला आहे. व्हाईट कॉलर गुन्हेगारी नियंत्रणात आणणे, संघटित अमली पदार्थ विक्रेत्यांवर कारवाई करणे, मानवी तस्करीला आळा घालणे, पीडितांना लैंगिक तस्करीच्या जाळ्यात अडकू न देणे, राज्य, देश व परदेशात तस्करांवर खटला चालवणे, अशा मोहिमेत सहभाग घेतला आहे.
संघटित मानवी तस्करीच्या जाळ्यातून त्यांनी दोन हजारांहून अधिक महिला व मुलींची सुटका केली आहे. कार्यकारी दंडाधिकाऱ्यांच्या मदतीने त्यांनी दोनशे कुंटणखाने बंद केली आहेत. वीटभट्ट्या व इतर ठिकाणी काम करणाऱ्या सात हजारांहून अधिक बालमजूर व वेठबिगारांची सुटका केली आहे. ओरिसा राज्यातील बालमजुरांसाठी त्यांनी सुरू केलेल्या विद्यालयाचा एका हजार विद्यार्थ्यांना फायदा झाला आहे.
देशाच्या गृहमंत्रालयाने प्रकशित केलेल्या मानवी तस्करीवरील आठ पुस्तकांमध्ये भागवत यांचे योगदान आहे. त्यांनी लिहिलेल्या ‘सिनर्जी बिटविन स्टेकहोल्डर्स’ हे पुस्तक दिल्लीच्या इंदिरा गांधी राष्ट्रीय विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट आहे. हैदराबाद येथील राष्ट्रीय पोलिस प्रशिक्षण अकादमी, मसुरी येथील आयएएस प्रशिक्षण अकादमी, एलबीएसएनएए व इतर अनेक राज्यांत त्यांना व्याख्यानासाठी बोलवले जाते.
व्हिएन्ना, ऑस्ट्रिया येथील संयुक्त राष्ट्र मानवी तस्करी विरोधी परिषद, अमेरिका येथील भारताने दहशतवाद रोखणे या विषयावरील व ह्यूमन ट्रॅफिकिंग आणि कम्युनिटी पोलिसिंग या परिसंवादात त्यांनी सहभाग नोंदवला आहे. गेल्या दहा वर्षांत झालेल्या स्पर्धा परीक्षेत त्यांनी मार्गदर्शन केलेले दोन हजार तीनशे अधिकारी देशसेवेत रुजू झाले आहेत. भागवत यांच्या याच सगळ्या धडाकेबाज कामगिरीची दखल घेत रेड्डी सरकारने त्यांची निवड केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.