Jalgaon Politics : राजुमामा 'भोळे'च राहिले, जळगावात सारे काही महाजनांच्या मर्जीनेच झाले

Girish Mahajan Politics : जळगावात मंत्री गिरीश महाजन यांचीच मर्जी चालते हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. आमदार सुरेश भोळे यांचा विरोध असतानाही गिरीश महाजन यांनी मोठा पक्षप्रवेश घडवून आणला.
Girish Mahajan Politics
Girish Mahajan PoliticsSarkarnama
Published on
Updated on

सचिन जोशी, जळगाव

Jalgaon Politics : जवळपास वर्षभरापासून प्रतीक्षेत असलेला माजी महापौरांसह नगरसेवकांचा भाजपतील प्रवेश सोहळा काल-परवा मंत्री गिरीश महाजनांच्या उपस्थितीत पार पडला. जळगावातही अन्य पक्षांमधून नगरसेवक घेण्याची वेळ यावी, हे भाजप गवगवा करीत असलेल्या ‘विकासाच्या पॅटर्न’वर प्रश्‍नचिन्ह निर्माण करणारे आहेच; पण. या प्रवेशसोहळ्याच्या वेळी निर्माण झालेला एकूणच गोंधळ पाहता कॉंग्रेसीकरण झालेल्या भाजपमध्ये तत्त्वांसोबत शिस्तीलाही काही स्थान राहिलेले नाही, असेच म्हणावे लागेल.

जळगाव शहरातील राजकारणाच्यादृष्टीने शुक्रवारी (ता.३१) मोठी घडामोड घडली. माजी महापौर नितीन लढ्ढा यांच्या नेतृत्वात आणखी एक माजी महापौर जयश्री महाजन, त्यांचे पती व महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते तथा जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील महाजन, स्थायी समितीचे माजी सभापती नितीन बरडे यांच्यासह माजी नगरसेवकांनी भाजपत प्रवेश केला. मंत्री गिरीश महाजन यांनी त्यांचे स्वागत केले. किंबहुना महाजनांच्याच मर्जीने ही सर्व मंडळी भाजपत प्रवेश करती झाली.

‘महाजनांच्या मर्जी’ने म्हणायचे कारण एवढेच की, ज्यांनी परवा भाजपत प्रवेश केला, त्यातील सुनील महाजन, जयश्री महाजन व अन्य काही जणांच्या प्रवेशाबाबत स्थानिक आमदार म्हणून सुरेश (राजूमामा) भोळे यांच्यासह काही पदाधिकाऱ्यांचा विरोध होता. तो असणेही स्वाभाविक. कारण, याच जयश्री महाजनांनी गेल्यावर्षी भोळेंच्या विरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून विधानसभा निवडणूक लढविली होती. त्याआधी २०२१मधील महापौरपदाच्या निवडणुकीत याच सुनील महाजनांनी भाजपचे नगरसेवक फोडून पत्नीला महापौर केले होते.

Girish Mahajan Politics
Kishor Patil : आमदार किशोर पाटलांना भाजपवर भरोसा का नाही? कुठे झाला दगाफटका..?

याच सुनील महाजनांवर महापालिकेची ब्रिटीशकालीन जलवाहिनी, भंगाराच्या कोट्यवधींच्या चोरीप्रकरणी दोन-तीन गुन्हेही दाखल आहेत, आणि त्यांनाच पक्षात प्रवेश भोळेंच्या पचनी पडणे तसे कठीणच होते. त्यामुळेही हा प्रवेशसोहळा जवळपास आठ-दहा महिने लांबला. आता विरोधानंतरही हा प्रवेश झाल्यानंतर भोळेंना लढ्ढांसह महाजनांशी जुळवून घेणे क्रमप्राप्त आहे. त्याचा प्रत्यय महिनाभरापूर्वी जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या एका कार्यक्रमात आला. या कार्यक्रमात सभापती असलेल्या महाजनांनी भोळेंचे दणक्यात स्वागत केले होते.

शिवतीर्थासमोरील जी. एम. फाउंडेशनच्या कार्यालयात हा प्रवेशसोहळा पार पडत असतानाचे चित्र पाहता भाजपच्या एकूणच स्थितीबद्दल कल्पना येते. दुपारी चार वाजता ठरलेला कार्यक्रम थोडा उशिराच सुरू झाला. भाजपत कधीकाळी संघटनात्मक पदांना महत्त्व होते. संघटनेतील जिल्हाध्यक्षांनी ठरवून दिलेल्या रचनेप्रमाणे कार्यक्रम होत असत. काळ बदलला, तसे भाजपचे तत्त्व, नियमही बदलले. म्हणायला संघटनात्मक पद महत्त्वाचे आहे, पण त्याला आता किंमत उरलेली नाही. परवाच्या प्रवेश सोहळ्यात कुठेही नियोजन, रचना नव्हती. मंचावर व सभोवताली एकच गर्दी झाली होती. नेते कोण, पदाधिकारी कोण व प्रवेश करणारे कोण? साराच गोंधळ होता. कार्यकर्त्यांसह सर्वच मंचावर गर्दी करीत होते. जळगाव शहरातीलच नव्हे, तर ग्रामीण भागातून येणारे काही कार्यकर्तेही प्रवेशासाठी गर्दी करीत होते. फाउंडेशनच्या बाहेर रस्त्यावर प्रचंड गर्दीने वाहतूक कोंडी झाली होती. सामान्य नागरिकांना त्याचा खूप त्रास होत होता. भाजपचे कॉंग्रसीकरणाचे हे चित्र जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांसाठी वेदनादायी होते. त्याबद्दल अनेकांनी खदखदही व्यक्त केली, असो.

Girish Mahajan Politics
Local Body Election : उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराचा उमेदवारी अर्ज भरण्याआधीच गेम झाला ! मतदारयादीतून नावच गायब

प्रदेशस्तरावर अन्य पक्षांमधून नेते, पदाधिकारी आयात करताना झालेल्या भाजपच्या ‘कॉंग्रेसीकरणा’चा यानिमित्ताने स्थानिकस्तरावरही प्रत्यय आलाच. २०१८च्या सार्वत्रिक निवडणुकीतही भाजपत अनेकांनी प्रवेश केला आणि अडीच वर्षांनी महापौरनिवडीच्या वेळी पक्ष सोडला, तसे पुढच्या काळात घडू नये, ही अपेक्षा!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com