

Jalgaon News : जळगाव जिल्हा बँकेत महायुतीने पॅनल जाहीर केले. या पॅनलचे 12 संचालक बिनविरोध झाले आहेत. त्यामुळे जिल्हा बँकेची सत्ता महायुतीकडे जाणार हे नक्की झाले. पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि भाजप नेते मंत्री गिरीश महाजन यांनी महायुतीची मोट बांधली. पॅनलची घोषणा करून महाविकास आघाडीला मोठा धक्का दिला. मात्र यातून महायुतीतच वादाची ठिणगी पडली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचा जिल्ह्यात एकच आमदार आहे. त्यामुळे या पक्षाला चार जागा देण्याचे आश्वासन मंत्री गिरीश महाजन यांनी दिले होते. या चार जागा कोणत्या यावरून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात वादाला तोंड फुटले. आता त्यावरून जाहीर आरोप प्रत्यारोप होत आहेत.
जिल्हा बँकेत वीस वर्ष संचालक राहिलेल्या ज्येष्ठ नेते डॉ सतीश पाटील यांना निवडणुकीत शेवटच्या क्षणी माघार घ्यावी लागली. त्यामुळे त्यांचा भ्रमनिरास झाला. जागा वाटपाची चर्चा करणाऱ्या स्वतःच्या पक्षातील नेत्यांनीच घात केला असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. माजी मंत्री गुलाबराव देवकर आणि बँकेचे माजी अध्यक्ष संजय पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडून जागा वाटपाची चर्चा करीत होते. त्यांनी माझ्या उमेदवारी ऐवजी चोपडा गटातील उमेदवारीचा आग्रह धरला. त्यामुळे आपला विश्वासघात झाला आहे.
माजी मंत्री देवकर आणि संजय पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्याच घरचा असल्यासारखे वर्तन करीत आहेत. त्यांनी आपला विश्वासघात करून राजकीय खेळी केली आहे. त्यांच्यामुळेच आपला जिल्हा बँकेत गेम झाला असा गंभीर आरोप डॉ पाटील यांनी केला.
डॉ. पाटील यांच्या आरोपांमुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षातच अंतर्गत वादाची ठिणगी पेटली आहे. माजी मंत्री गुलाबराव देवकर आणि संजय पवार यांनी या आरोपांचा इन्कार केला आहे. डॉ पाटील हे देखील जागा वाटपाच्या चर्चेत सहभागी होते. त्यामुळे त्यांनी बेजबाबदार विधाने टाळावीत, असे देवकर यांनी म्हटले आहे.
एकंदरच महायुतीने जिल्हा बँकेत आपली सत्ता भक्कम केली आहे. त्यात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा मोठा वाटा आहे. मात्र त्यातून महायुतीचा घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात वादाची ठणगी पडल्याने राजकारण तापले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.