
Maharashtra rave party controversy : राज्यातील ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर याला त्याच्या मित्रांसह पुणे पोलिसांनी रेव्ह पार्टीत अटक केली. या रेव्ह पार्टीबाबत रोज नवनवे खुलासे होत आहेत. आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. पुणे पोलिसांवर संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांकडून खुलासे होत आहेत. त्यामुळे आठवड्याभरापासून राज्यात चर्चेत आलेली 'रेव्ह पार्टी' नेमकी काय आहे, कायद्यात नेमका काय उल्लेख आढळतो, निकष अन् नियम काय सांगतात, यावर चर्चा सुरू आहेत.
परंतु, देशातील अमली पदार्थविरोधी कायद्यात (एनडीपीएस) रेव्ह पार्टी संकल्पना कुठेच आढळत नाही. पोलिसांच्या भाषेत अंडरवर्ल्ड, कंपनी, गँगवॉर शब्द जसे प्रचलित आहेत. पण त्याचप्रमाणे ‘रेव्ह पार्टी’ हा शब्दही रूढ झालेला असल्याचे दिसते.
पोलिस दलातील निवृत्त अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, कुख्यात दाऊद इब्राहिमचा भाऊ साबीर याची 1981 मध्ये प्रभादेवी इथल्या पेट्रोलपंपावर मन्या सुर्वे आणि साथीदारांनी हत्या केली. त्या गुन्ह्याची नोंद करताना, पहिल्यांदा मुंबई (Mumbai) पोलिसांनी टोळीयुद्ध अर्थात गँगवॉर शब्दाचा उल्लेख केला; मात्र कट, समाईक हेतू, हत्या आदी नेहमीचीच कलमे फिर्यादीत जोडली गेली.
म्हणजेच, तत्कालीन कायद्यात टोळीयुद्धातून घडलेल्या गुन्ह्यांसाठी (Crime) विशिष्ट कलमांची तरतूद नव्हती. महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधित कायदा (मकोका) अमलात येईपर्यंत टोळीयुद्धातून घडलेली हत्या, संघटित टोळ्यांनी केलेले अपहरण, खंडणीसाठी दिलेली धमकी या गुन्ह्यांसाठी आयपीसीप्रमाणे गुन्हे नोंद व्हायची.
एनडीपीएस कायद्यात रेव्ह पार्टीबाबत विशेष तरतूद, निकष आणि नियम नाहीत. या कायद्यानुसार, गांजापासून पार्टी ड्रग्स, एलएसडीपर्यंत कोणत्याही अमली पदार्थांचे सेवन, विक्री, साठवणूक, वाहतूक, उत्पादन, आदी प्रक्रिया गुन्हा ठरतो. त्यानुसार सार्वजनिक ठिकाणी किंवा खासगी जागेत कोणतीही कृती करणाऱ्या व्यक्तीविरोधात अमली पदार्थ बाळगणे, सेवन करणे गुन्हा ठरतो.
2007 मध्ये पुण्यात सिंहगड परिसरात आणि 2011 मध्ये रायगड जिल्ह्यातील खालापूर इथं पोलिसांनी उद्ध्वस्त केलेल्या पार्ट्यांना रेव्ह पार्टी म्हणता येते. त्यात सुमारे 600 व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले होते. त्यासाठी मद्य आणि अमली पदार्थांची खुलेआम विक्री आणि सेवन असते.
1980च्या दशकात ब्रिटनमध्ये अशा पार्ट्या सुरू झाल्या. ज्या वेगवान संगीत आणि सलग नृत्यासाठी ओळखल्या जात. थकवा दूर करण्यासाठी मद्यासोबत अमली पदार्थांचे सेवन व्हायचे. त्याचे लोण युरोप, अमेरिकेत पसरत, पुढे जाऊन जगभर झाले.
एकनाथ खडसे यांचा जावई प्रांजल खेवलकर याला पुण्यातील एका सोसायटीच्या फ्लॅटमध्ये मित्रांसमवेत पार्टी करताना अटक करण्यात आली. अमली पदार्थविरोधी यंत्रणांनी ही कारवाई केली. पुणे पोलिसांनी उद्ध्वस्त केलेली पार्टी रेव्ह की, हाउस, यावरून कायद्यानं चर्चा सुरू आहे. परंतु ही हाऊस पार्टी असल्याचा दावा केला जात आहे. याशिवाय या कारवाईत जप्त केलेल्या अमली पदार्थांचे प्रमाण व्यावसायिक नसल्याचे सांगितले जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.