
ED action Maharashtra politics : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री एका पाठोपाठ अडचणीत येण्याची मालिका सुरूच आहे. आता मंत्री दादा भुसे अडचणीत येत असल्याचे संकेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी दिलेत.
मंत्री संजय शिरसाट, मंत्री संजय राठोड, मंत्री योगेश कदम यांच्यानंतर आता शिक्षण मंत्री दादा भुसेंचा नंबर असल्याने एकनाथ शिंदे यांनी कुणीतरी इशारा देत आहे. वसई-विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर काल पडलेल्या 'ईडी'चा छापा आणि निकषात नसताना त्यांनी दिलेली नियुक्ती, त्यामागील प्रमुख कारण असल्याचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.
खासदार संजय राऊत म्हणाले, "वसई-विरार महापालिकेच्या माजी आयुक्तांवर 'ईडी'चा छापा पडला आहे. त्यांना नियम बाह्यपद्धतीने त्या पदावर बसवण्यात आलं आहे. दादा भुसेंचा (Dada Bhuse) आग्रह होता. उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री असताना, अनिलकुमार पवार यांना बसावं असा दादा भुसेंचा आग्रह होता. पण दादा भुसेंची इच्छा एकनाथ शिंदे यांनी पूर्ण केली".
''ईडी'चे छापे अशा अधिकाऱ्यावर पडले आहेत की, फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या मंत्रिमंडळातील एका मंत्र्यांनी नियुक्ती केलेला हा अधिकारी आहे. याचा अर्थ त्या छाप्याचे धागेदोरे संबंधित मंत्र्यांपर्यंत जाऊ शकतात. कारण, संबंधित अधिकाऱ्यांना नेमण्याचं काम दादा भुसेंनी केलं, ही चर्चा तेंव्हा देखील होती आणि आता देखील आहे. ते रेकाॅर्डवर देखील आहे. संबंधित अधिकाऱ्याच्या नियुक्तीसाठी दादा भुसे यांचे शिफारस पत्र होते', असा दावा देखील संजय राऊत यांनी केला.
'आता तपास यंत्रणा काय करत आहे हे पाहू. कारण महाराष्ट्र नवीन फडणवीस अॅक्ट आला आहे. समज द्या अन् सोडून द्या. जसं काल मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांना सोडून देण्यात आलं', असा घणाघात संजय राऊत यांनी केला.
शिंदेंच्या निगडीत, नातेवाईकांभोवती कारवाईचा फास आवळला जातोय, यावर भाष्य करताना संजय राऊत म्हणाले, हे सर्व दबावाचं राजकारण आहे. झारखंड मद्य घोटाळ्यातील अमित साळुंके असेल, काल वसई-विरार महापालिकांच्या आयुक्तांवर पडलेला छापा असेल, हे सर्व पाहता एकनाथ शिंदे यांच्या लोकांना कोणीतरी इशारा देत आहे, याद राखा, काही हालचाल केलात तर, सर्व फाईली टेबलावर आहेत. परंतु या फाईली पोलिसांकडे केव्हा जाणार हे पाहावं लागेल.
सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) काल पहाटेपासून अॅक्शन मोडवर येत, मुंबई, वसई-विरार आणि नाशिकमध्ये 12 ठिकाणी छापे घातले. नालासोपाराच्या 41 अनधिकृत इमारतीप्रकरणी 'ईडी'ने ही कारवाई केली. यात वसई-विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्या सरकारी निवासस्थानाचा देखील छाप्यात समावेश आहे. 'ईडी'ने इथून महत्त्वपूर्ण कागदपत्र ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे. अनिलकुमार पवार यांनी तीन दिवसांपूर्वीच आयुक्तपदाचा पदभार सोडून आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी यांच्याकडे दिला होता. यानंतर अनिलकुमार यांच्यावर कारवाई सुरू झाल्याने 'ईडी'च्या छाप्याचे टायमिंग देखील चर्चेत आलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.