Jalgaon MLC Election: नाशिकचा तिढा सुटला, आता चिंता जळगावची; महाजनांची खरी परीक्षा; रेश्मा काळे माघार न घेण्याची 5 कारणे

Jalgaon Legislative Council Election: नाशिकमधील बंडखोरी शांत झाल्यानंतर जळगाव विधान परिषद निवडणुकीत महायुतीसमोर नवे आव्हान उभे ठाकले आहे. रेश्मा काळे यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे भाजप आणि गिरीश महाजन यांच्या रणनीतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Jalgaon legislative council election controversy
Jalgaon legislative council election controversySarkarnama
Published on
Updated on

Jalgaon election battle intensifies: विधान परिषद निवडणुकीत नाशिकमध्ये महायुतीचा तिढा अखेर सुटला आहे. बंडखोर उमेदवार गोकुळ गिते यांनी काल (गुरुवारी) उमेदवारी मागे घेतली. मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री उदय सामंत यांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर हा निर्णय झाला.

गिते यांच्या माघारीने महायुतीने सुटकेचा निश्वास टाकला. पण नाशिकमध्ये गिरीश महाजन यांची शिष्टाई फळाला आली असली तरी जळगाव विधान परिषदेत महाजन यशस्वी ठरणार का? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

नाशिक विधान परिषद निवडणुकीनंतर आता जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूकही महायुतीसाठी प्रतिष्ठेची ठरताना दिसत आहे. भाजपने नंदकिशोर (नंदकुमार) महाजन यांना उमेदवारी दिली असली, तरी शिवसेनेच्या (शिंदे गट) समर्थक नेत्या रेश्मा काळे यांनी अपक्ष उमेदवारी कायम ठेवल्याने महायुतीसमोर अनपेक्षित आव्हान उभे ठाकले आहे.

राजकीय समीकरणे

जागावाटपात जळगावची जागा भाजपच्या वाट्याला गेल्यानंतर नंदकिशोर महाजन यांची उमेदवारी जाहीर झाली. मात्र, स्थानिक पातळीवरील नाराजी उघडपणे समोर आली आणि त्यातून रेश्मा काळे यांनी अपक्ष अर्ज दाखल केला. उमेदवारी मागे घेण्यासाठी विविध स्तरांवरून प्रयत्न झाल्याची चर्चा असली, तरी त्यांनी माघार घेण्यास नकार दिल्याने राजकीय समीकरणे अधिकच गुंतागुंतीची बनली आहेत.

Jalgaon legislative council election controversy
Lok Sabha Delimitation: 170 मतदारसंघांचे विभाजन, लोकसभेच्या 824 जागा; नवा फॉर्म्युला, दक्षिण-उत्तर वाद मिटणार?

महाजनांचे अपयश

या संपूर्ण घडामोडीत भाजपचे ज्येष्ठ नेते आणि उत्तर महाराष्ट्रातील प्रभावशाली रणनीतीकार गिरीश महाजन यांच्याकडे विशेष लक्ष लागले आहे. जळगाव हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. पक्षातील नाराजी नियंत्रणात ठेवणे आणि बंडखोरी रोखणे ही त्यांची खासियत समजली जाते. मात्र, स्वतःच्या प्रभावक्षेत्रातच बंडखोर उमेदवाराला माघार घेण्यास राजी करण्यात अपयश आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

गणिते जुळवावी लागणार

संख्याबळाच्या दृष्टीने भाजपचे पारडे जड मानले जात असले, तरी बंडखोरीमुळे निवडणूक एकतर्फी राहिलेली नाही. स्थानिक गटबाजी, नाराज कार्यकर्ते आणि संभाव्य क्रॉस व्होटिंग यामुळे महायुतीची चिंता वाढल्याचे चित्र आहे. त्यामुळे सहज विजयाची अपेक्षा असलेल्या भाजपला आता प्रत्येक मताची गणिते जुळवावी लागत आहेत.

Jalgaon legislative council election controversy
Nashik MLC Election: गोकुळ गीते यांची माघार, भाव मात्र गिरीश महाजन यांचा वधारला

महायुतीतील अस्वस्थता

जळगावात बंडखोरीचा पेच कायम आहे. भाजपचे नंदकिशोर महाजन, शिवसेनेचे शरद तायडे आणि अपक्ष रेश्मा काळे यांच्यात लढत होत असताना काळे माघार घेण्यास तयार नाहीत. उलट भाजपमधील काही नगरसेवक संपर्कात असल्याचा दावा त्यांनी केल्याने महायुतीतील अस्वस्थता वाढल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

उत्सुकता कायम

दुसरीकडे, रेश्मा काळे यांनीही आपली भूमिका कायम ठेवली आहे. वरिष्ठ नेतृत्वाकडून समाधानकारक निर्णय होईपर्यंत माघार घेणार नसल्याचा त्यांचा पवित्रा असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत या निवडणुकीतील उत्सुकता कायम राहणार आहे.

एकनाथ शिंदे मध्यस्थी

रेश्मा काळे माघार घेण्यास तयार नसल्याने महायुतीची डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे नंदकिशोर महाजन यांच्यासमोरील आव्हान अधिक कठीण बनले असून, हा तिढा सोडवण्यासाठी एकनाथ शिंदे यांना स्वतः मैदानात उतरावे लागणार का, याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. जळगावातील या घडामोडींवर आता राज्यभरातील नेत्यांचे लक्ष केंद्रित झाले आहे.

रेश्मा काळे माघार न घेण्यामागची 'ही' पाच प्रमुख कारणे

1. स्थानिक कार्यकर्त्यांमधील नाराजी

जागावाटपात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना डावलण्यात आल्याची भावना स्थानिक पातळीवर असल्याचे बोलले जाते. याच नाराजीतून काळे यांनी उमेदवारी कायम ठेवल्याचे मानले जात आहे.

2. स्वतंत्र राजकीय ताकद दाखवण्याची संधी

जळगावमधील स्वतःचा जनाधार आणि संघटनात्मक ताकद सिद्ध करण्याची संधी म्हणूनही या निवडणुकीकडे पाहिले जात आहे.

3. भाजपमधील असंतोषावर भरवसा

काही भाजप पदाधिकारी व नगरसेवक संपर्कात असल्याचा दावा काळे यांनी केला आहे. त्यामुळे मतदारांमध्ये पर्यायी समीकरण उभे राहू शकते, असा त्यांचा अंदाज असू शकतो.

4. वरिष्ठ नेतृत्वाकडून ठोस आश्वासनाची प्रतीक्षा

महायुतीतील वरिष्ठ नेत्यांकडून अपेक्षित तोडगा किंवा राजकीय समन्वय न झाल्याने काळे माघार घेण्यास तयार नसल्याची चर्चा आहे.

5. राजकीय संदेश

ही निवडणूक केवळ एका जागेची नसून स्थानिक पातळीवरील राजकीय अस्तित्व आणि ताकद दाखवण्याची संधी असल्याने काळे शेवटपर्यंत लढण्याच्या भूमिकेत असल्याचे दिसत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com