

Jalgaon MLC Election : जळगाव विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी देण्यात आली आहे. परंतु त्यांचे नाव स्थानिक पातळीवर फारसे चर्चेत नसताना, अचानक कसे पुढे आले याची चर्चा सध्या जळगावच्या राजकीय वर्तुळात सुरु आहे.
जिल्ह्यातील भाजपचे नेते मंत्री गिरीश महाजन तसेच आमदार मंगेश चव्हाण यांच्या पसंतीला डावलून हा निर्णय घेण्यात आल्याची चर्चा आता जळगावच्या राजकारणात अचानकच सुरु झाली आहे. गिरीश महाजन यांचा वेगळ्या नावाचा आग्रह होता, मात्र थेट वरिष्ठ पातळीवरून नंदकिशोर महाजन यांचे नाव फायनल झाल्याचे कानावर ऐकायला येत आहे.
विधानपरिषदेसाठी मंत्री गिरीश महाजन यांनी डॉ. केतकी पाटील आणि नंदू अडवाणी यांच्या नावाचा आग्रह धरला होता. पंरतु थेट वरिष्ठ पातळीवरून नंदूकिशोर महाजन यांना उमेदवारी देण्यात आल्याचे सांगितले जाऊ लागले आहे. स्वत : गिरीश महाजन यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना नंदकिशोर महाजन यांची उमेदवारी थेट वरिष्ठांकडून निश्चित झाल्याचे स्पष्ट केले आहे.
गिरीश महाजन व मंगेश चव्हाण चव्हाण यांच्यासारख्या प्रस्थापित नेत्यांचा आग्रह नसतानाही नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी मिळण्यामागे पक्षात एक समांतर गट सक्रिय असल्याचे बोलले जात आहे. या गटानेच नंदकिशोर महाजन यांच्या नावाची शिफारस करुन त्यांच्यासाठी मोर्चेबांधणी केल्याची चर्चा आहे. या प्रक्रियेत महाजन व चव्हाण यांना बॅकफूटवर ठेवण्यात आल्याचीही चर्चा आहे.
पंरतु गिरीश महाजन हे जिल्ह्यातील भाजपचे मोठे नेते आहेत. त्यांच्यापाठोपाठ मंगेश चव्हाण यांच्या शब्दालाही किंमत आहे. त्यामुळे सहसा या दोघांच्या शिफारशीला डावलून भाजप पक्षश्रेष्ठी असा निर्णय घेतील असे वाटत नाही. त्यामुळे उमेदवारी डावलण्यात आलेल्या केतकी पाटील व नंदू अडवाणी यांच्यासह अन्य इच्छुकांची नाराजी ओढावली जाऊ नये, यादृष्टीने हे फेक नॅरेटीव्ह पसरवले जात असल्याची चर्चाही दबक्या आवाजात सुरु आहे.
एकीकडे नंदकिशोर महाजन जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा विचार करत असताना त्यांची थेट विधानपरिषदेसाठी वर्णी लागली आहे. ते मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय आहेत. याशिवाय दोघेही एकाच समाजाचे आहेत. असे असताना महाजन यांची शिफारस डावलून थेट वरिष्ठांनी नंदकिशोर महाजन यांचे नाव निश्चित केले असल्याचे मत राजकीय जाणकारांच्या पचनी पडत नाही.
याशिवाय, भाजपने विधानपरिषदेच्या लढवलेल्या राज्यातील ११ जागांपैकी ४ जागांवर उमेदवार अन्य पक्षातून आयात केले आहेत. त्यावरुन भाजपवर विरोधकांनी टीका देखील केली. अशात केतकी पाटील जरी भाजपमध्ये सक्रीय असल्या तरी त्यांचे वडील उल्हास पाटील हे कॉंग्रेसचे खासदार राहिले आहेत. अशात केतकी पाटील यांना उमेदवारी दिली असती तर खान्देशातही भाजपने निष्ठावंतांना संधी न दिल्याची टीका झाली असती. म्हणून पक्षातीलच निष्ठावान म्हणून नंदकिशोर महाजन यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले असावे असेही मत काही राजकीय जाणकारांचे आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.