

Jalgaon Politics : जळगाव महानगरपालिकेमध्ये मतदानापूर्वीच महायुतीची लाट उसळली असून शिवसेना व भाजपचे तब्बल १२ नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत. यामध्ये भाजपचे जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे यांचे पुत्र विशाल भोळे यांची प्रभाग क्रमांक सात मधून बिनविरोध निवड झाली आहे. त्यांच्याविरोधात असलेल्या आठ जणांनी अर्ज माघारी घेतल्याने काल माघारीच्या अंतिम दिवशी त्यांची बिनविरोध निवड निश्चित झाली.
एकीकडे भाजप पक्षश्रेष्ठींनी पक्षातील घराणेशाही रोखण्यासाठी आदेश दिले आहेत. आमदार -खासदारांच्या कुटुंबातील नातेवाईक तसेच मुलगा-मुलगी-पत्नी कुणालाही उमेदवारी देण्यात येऊ नये, असे आदेश भाजप वरिष्ठांनी दिले आहेत. मात्र भाजप आमदार सुरेश भोळे यांनी पक्षाचे आदेश धुडकावत पुत्र विशाल भोळे यांना एबी फॉर्म दिला आणि त्यांची बिनविरोध नगसेवकपदी निवडही झाली आहे.
नाशिकमध्ये भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी त्यांचे पुत्र अजिंक्य फरांदे यांचा वाजत-गाजत उमेदवारी अर्ज दाखल केला होता. तसेच आमदार सीमा हिरे यांनीही आपली मुलगी रश्मी हिरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र आमदार-खासदारांनी आपल्या कुटुंबातील सदस्यांना उमेदवारी देऊ नये. त्याऐवजी पक्षातील इतर निष्ठावान कार्यकर्त्यांना संधी द्या असे पक्षश्रेष्ठींकडून आदेश आल्याबरोबर फरांदे व हिरे दोन्ही आमदारांनी आपल्या मुलांची उमेदवारी मागे घेतली.
एकंदरीत आमदार फरांदे व हिरे यांनी पक्षांच्या आदेशाचे, सूचनेचे पालन तंतोतंत केले. असे असताना मात्र जळगाव शहरातील भाजपचे आमदार सुरेश भोळे यांनी या आदेशाची पायमल्ली केली असल्याने सुरेश भोळे यांना भाजपाचा आदेश मान्य नसावा, अशीच चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
दरम्यान भाजप आमदार सुरेश भोळे यांचे पुत्र विशाल भोळे हे बिनविरोध नगसेवक झाले असून त्यांचे म्हणणे आहे की, प्रभाग क्रमांक 7 हा आमचा आधीपासूनचा गड आहे. त्या ठिकाणी तब्बल वीस वर्षापासून माझी आई सीमा भोळे या ठिकाणी प्रतिनिधित्व करीत आहे, मात्र यावेळेस त्यांना पक्षाने संधी न दिल्याने पक्षाने मला त्या ठिकाणी संधी दिली आहे. त्यामुळे ही कुठलीही घराणेशाही नसून गेल्या 20 वर्षापासून आम्ही आमच्या स्वतःच्या प्रभागामध्ये प्रतिनिधित्व करीत असल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.