
Manikrao Kokate : राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवर कृषीमंत्री माणिकराव काकाटे हे विधिमंडळाच्या सभागृहात मोबाईलवर रमी खेळत असल्याचा व्हिडीओ पोस्ट केला. शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित असताना, राज्यात रोज ८ शेतकरी आत्महत्या करत असताना सुद्धा काही कामच नसल्याने कृषिमंत्र्यांवर रमी खेळण्याची वेळ येत असावी अशी टीका रोहित पवारांनी केली. त्यानंतर या व्हिडीओवरुन विरोधकांनी कोकाटे यांना चौफेर घेरलं आहे. सगळीकडून त्यांच्यावर टीका होत आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या व महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी देखील आता कोकाटे यांच्यावर जहरी शब्दांत टीका केली आहे. त्यांनी एक्स पोस्ट करत कोकाटे यांचा समाचार घेतला आहे. एक्का, दुर्री, तुर्ती आणि हा बघा जोकर...शेतकऱ्यांच्या आयुष्याचा खेळ करून मंत्री महोदय ऑनलाईन रमी खेळत आहेत. मंत्रीपद न राहण्याच्या सर्व अटी कृषीमंत्र्यांनी पूर्ण केल्या आहेत.- त्यांच्या खात्यात भ्रष्टाचार होतोय- ते शेतकऱ्यांना भिकारी म्हणतात- अर्वाच्य भाषेत बोलतात पण शेतकऱ्यांबाबत एकही काम करत नाही...अशी टीका
दरम्यान कोकाटे यांच्यावर विरोधातील अनेक नेत्यांनी टीका केली आहे. कोकाटे यांच्या या व्हिडीओवरुन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी थेट सरकार आणि मंत्रिमंडळावर जोरदार हल्ला चढवला. महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ म्हणजे येड्याची जत्रा आणि पेढ्याचा पाऊस झाला आहे, अशा शब्दांत त्यांनी सरकारची खरडपट्टी काढली. कृषीमंत्र्यांकडून आठवी नववी चूक असेल त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार? आमचा कृषी मंत्रीच रमीत गुंग असेल तर शेतकऱ्यांचे काय भले होईल, अशी संतप्त प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली.
विरोधकांकडून चारही बांजूनी टीका होत असताना यावर कृषीमंत्री कोकाटे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. हा विधान परिषदेमधला व्हिडिओ असावा. सभागृहात सीसीटीव्ही आहेत व सभागृहाचे नियम मला माहीत आहे. त्यामुळे मी असं काही करू शकत नाही. सभागृह स्थगित झाले होते, तेव्हा वरिष्ठ सभागृहात काय चालले आहे हे युट्यूबवर पाहण्यासाठी मी फोन सुरु केला होता. मात्र तेव्हा जंगली रम्मीची जाहीरात समोर आली, मी लगेच ती स्कीप करत होतो. त्यावेळचा तो व्हिडिओ आहे असं कोकाटे यांनी म्हटलं आहे.
रोहित पवारांच्या मोबाईलवर जाहीराती येत नाहीत का? असा सवाल कोकाटेंनी केला. ते म्हणाले. अशाप्रकारच्या जाहिराती येणं हे अपरिहार्य आहे. पण कोणत्या गोष्टीचे भांडवल करावं, कोणत्या गोष्टीचे भांडवल करु नये, हे रोहित पवारांना कळायला हवं. उगाचच ते स्वत:ची करमणूक करुन घेतात असे माणिकराव कोकाटेंनी म्हटले.
रोहित पवारांनी नेमकी काय पोस्ट केली होती?
सत्तेतल्या राष्ट्रवादी गटाला भाजपला विचारल्याशिवाय काहीच करता येत नाही म्हणूनच शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित असताना, राज्यात रोज ८ शेतकरी आत्महत्या करत असताना सुद्धा काही कामच नसल्याने कृषिमंत्र्यांवर रमी खेळण्याची वेळ येत असावी.
रस्ता भरकटलेल्या या मंत्र्यांना आणि सरकारला पिकविमा-कर्जमाफी-भावांतर ची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांची “कभी गरीब किसानो कीं खेतीपर भी आओ ना महाराज” ही आर्त हाक ऐकू येईल का? अशी एक्स पोस्ट रोहित पवारांनी पोस्ट केली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.