

Girish Mahajan News: सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे जिल्हा परिषद निवडणुकीचे राजकारण तापण्यात सुरुवात झाली आहे. जळगाव जिल्ह्यात शिवसेना एकनाथ शिंदे आणि भाजप यांच्यात राजकीय वर्चस्वाचा संघर्ष तीव्र होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे महायुतीच्या नेत्यांना एकत्र ठेवण्याचे आव्हान आहे.
सर्वोच्च न्यायालयाने 50% पेक्षा अधिक आरक्षण असलेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकांना हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे जळगाव जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचा निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. सध्याच्या स्थितीत महायुतीतील भाजप आणि शिवसेना एकनाथ शिंदे पक्षात यावरून मोठी चुरस निर्माण होण्याची चिन्हे आहेत.
नगरपालिका निवडणुकीत शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या नेत्यांनी थेट वरिष्ठ नेत्यांची भेट घेऊन स्वतंत्र निवडणूक लढविण्याचा आग्रह धरला होता. त्यावरून सत्ताधारी महायुतीत मोठा गोंधळ झाला होता. त्यात काही ठिकाणी भाजप विरुद्ध शिवसेना शिंदे पक्ष अशी सरळ लढत झाली होती.
आता जिल्हा परिषद निवडणुकीसाठी देखील एकनाथ शिंदेंच्या शिवसेना पक्षाच्या आमदारांच्या मतदारसंघात त्याची पुनरावृत्ती होण्याची चिन्हे आहेत. यामध्ये पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची कोंडी होण्याची चिन्हे आहेत. सध्या भाजप आणि शिवसेना पक्षात पडद्यामागे आणि उघडपणे राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. त्यामुळे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना पक्षाच्या नेत्यांना भूमिका सांगताना मोठी कसरत करावी लागणार आहे.
भाजप नेते गिरीश महाजन यांच्या समर्थकांनी स्वबळावर निवडणुकीचे संकेत दिले आहेत. त्यामुळे महायुती जिल्हा परिषद निवडणुकीत एकत्र मतदारांना सामोरे जाणार की एकमेकांविरुद्ध उमेदवार देणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे.
जळगाव जिल्हा परिषदेत गेल्या पाच वर्षांपासून प्रशासकीय राजवट आहे. येत्या मार्च महिन्यात तो कालावधी पूर्ण होत आहे. त्यामुळे निवडणुकीच्या हालचाली गतिमान होणार आहेत.
सध्या जळगाव जिल्हा परिषदेत 67 जागांपैकी भाजपकडे 33 जागा आणि सत्तेची सर्व पदे आहेत. शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाकडे 14 जागा तर उर्वरित जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेसच्या सदस्य आहेत. मात्र गेल्या निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन गट निर्माण झाले आहेत. त्यामुळे राजकीय स्थिती बदलली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.