

Election News: आजच्या वेगवान जगात ४० सेकंदांची रील पूर्ण पाहण्याचाही अनेकांना कंटाळा येतो. इंटरनेट थोडं स्लो झालं, तरी अस्वस्थता वाढते. मग निवडणुका बॅलेट पेपरवर झाल्या आणि निकालासाठी एक-दोन दिवस वाट पाहावी लागली, तर काय होईल? ईव्हीएमऐवजी मतपत्रिकेवर मतदान घेण्याच्या मागणीवरून सध्या हाच प्रश्न उपस्थित केला जात आहे. शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या संथ मतमोजणीचा संदर्भ देत, बॅलेट पेपरवर मतदान घ्यायला हरकत नाही; पण निकालाची प्रतीक्षा करण्याची तयारी आहे का?
४० सेकंदांची रील पूर्ण पाहण्याची स्टॅमिना लोकांकडे नाही. पाच-दहा सेकंदांतच बोटाने वर ढकलून पुढची रील पाहायला सुरुवात होते. वन डे मॅच बघायला नको वाटते, २०-२० ला पसंती दिली जाते. नेट थोडं स्लो झालं, तरी लोक लगेच बेचैन होतात. त्यात मी पण आहे. अशा काळात लोक सगळ्या निवडणुका ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर घ्या, अशी मागणी करतात.
देशात कुठेही विधानसभा निवडणूक पार पडली की पराभूत पक्ष ईव्हीएमवर खापर फोडतो आणि मतपत्रिकेवर मतदान घ्या, अशी मागणी करतो. मोर्चे काढतो, आणखी बरंच काही करतो. ईव्हीएम हॅक होत असल्याच्या संशयावरून हे सगळं होतं. पण तरीही समजा बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याचा निर्णय झालाच, तर निकाल लागेपर्यंत शांत बसण्याची क्षमता आहे का? कारण ईव्हीएमवर निवडणूक झाली की दुपारी १२ वाजेपर्यंत कल स्पष्ट होतात. संध्याकाळी ६ वाजेपर्यंत जवळपास सगळे निकाल जाहीर होतात.
आता बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी केली जाते. विधानसभेला किमान चार लाख, तर लोकसभेला १८ ते २१ लाख मतदान असतं. त्यापैकी ६० ते ७० टक्के मतदान झालं, तरी लोकसभेला हा आकडा १० लाखांच्या पुढे जातो. या मतपत्रिका मोजून पूर्ण होईपर्यंत लोक येडे होतील! मतमोजणी किमान दोन दिवस तरी आरामात चालेल. एक फेरी पूर्ण व्हायला अनेक तास लागतील. भारतीय जनतेकडे एवढी सहनक्षमता राहिलेली नाही.
आज बघा, पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांची मतमोजणी बॅलेट पेपरवर होत आहे. प्रत्यक्षात मतमोजणी सुरू व्हायला अख्खा दिवस गेलाय. या निवडणुकांची मतमोजणी करण्याची पद्धत वेगळी असते, ही बाब मान्य; तरीही अपडेटसाठी खूप वाट पाहावी लागते.
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांची निवडणूक ईव्हीएमवर झाली असती, तर आत्तापर्यंत सगळे आपापल्या घरी जाऊन झोपले असते. पण एवढं सोपं नाही. मी आत्ता पोस्ट लिहित असताना पदवीधर मतदारसंघाची पहिली फेरी आणि शिक्षक मतदारसंघाची दुसरी फेरी सुरू आहे.
बॅलेट पेपरवर मतदान घ्यायला माझी हरकत नाही पण तुमची तयारी आहे का बघा...
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.