Congress News : अयोध्येतील राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्यापूर्वी कर्नाटकात गोध्रासारखी घटना घडू शकते, असा दावा काँग्रेसनेते बीके हरिप्रसाद यांनी बुधवारी केला. काँग्रेसचे नेते हरिप्रसाद यांनी कर्नाटक सरकारला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. येत्या काळात अशा स्वरूपाच्या घटना घडू नये, म्हणून कर्नाटक सरकारने सतर्क राहावे, कारण त्याच काळात गुजरातमधील गोध्रा येथे कारसेवकांनी आग लावली होती. 2002 मध्ये गुजरातमधील गोध्रात ट्रेन जाळण्याच्या घटनेमुळे जातीय दंगल घडली होती, याची आठवण त्यांनी करून दिली.
काँग्रेसनेते बीके हरिप्रसाद यांच्या वक्तव्यावरून येत्या काळात वादात भर पाडण्याची शक्यता आहे. त्यांचे वक्तव्य केवळ निषेधार्ह नाही, तर त्यांच्यावर पोलिस कारवाईही झाली पाहिजे, अशी मागणी भाजपकडून करण्यात आली.
माजी खासदार बीके हरिप्रसाद (Bk Hariprasad) म्हणाले, गोध्रासारखी परिस्थिती येथेही उद्भवू शकते. त्यामुळे कर्नाटकात कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, याची दक्षता घ्यावी. कर्नाटकातून अयोध्येला जाऊ इच्छिणाऱ्या नागरिकांसाठी सर्व व्यवस्था करण्यात याव्यात, जेणेकरून कर्नाटकातील दुसरे गोध्रा पाहावे लागू नये, असेही त्यांनी म्हटले आहे.
अयोध्येतील राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्यासाठी काँग्रेस (Congress) नेत्यांना दिलेल्या निमंत्रणावर हरिप्रसाद म्हणाले, या कार्यक्रमाकडे धार्मिक दृष्टिकोनातून न पाहता राजकीय दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे. जर कोणत्याही हिंदू धर्मगुरूने राम मंदिराचे उद्घाटन केले असते, तर मी अयोध्येला कोणत्याही निमंत्रणाशिवाय गेलो असतो.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
तर मी पण उपस्थित राहिलो असतो...
हिंदू धर्मातील चार प्रमुख शंकराचार्यांचा उल्लेख करून के. हरिप्रसाद म्हणाले की, शंकराचार्यांनी किंवा कोणत्याही धर्मगुरूने राम मंदिराचे उद्घाटन केले असते तर मीही कार्यक्रमात सहभागी झालो असतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीयमंत्री अमित शाह हे 'धार्मिक गुरू' नसून राजकीय नेते आहेत. हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. 22 जानेवारीला राम मंदिराचा अभिषेक केला जाणार आहे, ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह नेतेमंडळी उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
(Edited by Sachin Waghmare)