
Maharashtra politics : गेल्या आठवड्यात धुळे जिल्ह्यातील कॉंग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला. पाटील घराणं तब्बल तीन पिढ्यांपासून कॉंग्रेससोबत होतं परंतु भाजपने ते फोडलं. त्यामुळे धुळ्यात कॉंग्रेसला मोठा धक्का बसला असून भाजपने दिलेल्या या झटक्यानंतर पक्ष अॅक्टीव मोडवर आला आहे. कॉंग्रेसच्या गोटात डॅमेज कंट्रोलसाठी हालचालींना वेग आला आहे.
भाजपने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर उत्तर महाराष्ट्रात मोठी इनकमिंग मोहीम सुरु केलेली आहे. त्याचाच भाग म्हणून भाजपने कुणाल पाटील यांना गळाला लावलं. त्यामुळे भाजपने कॉग्रेसकडे आपला मोर्चा वळवल्याने पक्षश्रेष्ठी सावध झाले आहेत. त्यासाठी बैठकांचा सिलसिला सुरु झाला आहे. धुळे शहर व जिल्ह्यातील कॉंग्रेस स्थितीचा आढाव घेण्यासाठी आज सोमवारी (ता. ७) काँग्रेस भवन येथे बैठक होत आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी धुळ्यातील कॉंग्रेसच्या स्थितीकडे लक्ष केंद्रीत केलं आहे. त्यांच्या आदेशाने या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे महासचिव व प्रवक्ते सचिन सावंत बैठकीच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत. खासदार डॉ. शोभा बच्छाव यांनी धुळे जिल्हा काँग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकारी व कार्यकत्यांना या बैठकीसाठी निमंत्रण दिलं.
धुळे शहर व जिल्ह्यातील काँग्रेसची सद्यःस्थिती, तसेच धुळे जिल्हा काँग्रेस कमिटी, ग्रामीण व शहर यांची अध्यक्षपदे, जिल्ह्यातील विविध पदांवर करावयाच्या नेमणुका, तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या विषयांवर धुळे जिल्हा काँग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकारी व कार्यकत्यांशी या बैठकीत चर्चा होत आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका पाहाता पक्षातील गटबाजी व गळती रोखणे हे कॉंग्रेस नेतृत्वापुढील मोठे आव्हान असणार आहे. त्यासंदर्भातही या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. कुणाल पाटील यांनी पक्ष सोडल्याने पक्षाला मोठं खिंडार पडलं आहे. विशेषत: धुळे ग्रामीणध्ये मोठा फटका बसला आहे. त्यामुळे कॉंग्रेसपुढील आव्हाने अधिक वाढली आहे.
सध्य स्थितीत धुळ्यात भाजपपुढे महाविकास आघाडीच्या तीन्ही पक्षांचा टिकाव लागले अवघड आहे. महाविकास आघाडी धुळ्यात खिळखिळी झालेली आहे. महायुतीमधील घटक पक्षांचा जरी विचार केला तरी जिल्ह्यात भाजपच वरचढ आहे. त्यामुळे धुळे महापालिका निवडणुकीत भाजप स्वबळावरच लढण्याचा विचार करेल. अशात भाजपसमोर महाविकास आघाडीतील तीन्ही पक्षांना एकत्र येत लढण्याशिवाय पर्याय नसल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.