Nagar News : शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी रिपाई आठवले गटाकडून भाजपवर दबाव वाढवला जात आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंना शिर्डीत उमेदवारी न दिल्यास शिर्डी, सोलापूर आणि नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ रिपाई आठवले गटाकडून अपक्ष उमेदवार दिले जातील, असा इशारा देण्यात आला आहे. आठवले गटाचा या वाढत्या दबावामुळे भाजप आणि शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे टेन्शन वाढले आहे.
भाजपने महाराष्ट्रात २० उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. यात नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवाराचा देखील समावेश आहे. विद्यमान खासदार सुजय विखे यांना येथे उमेदवारी जाहीर झाली आहे. नगर जिल्ह्यात शिर्डी आणि नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ आहे, असे असताना महायुतीतील प्रमुख भाजपने उमेदवारांची नावे जाहीर केले. यात नगर दक्षिणचा उमेदवाराचा समावेश आहे. परंतु शिर्डी मतदारसंघात शिवसेना एकनाथ शिंदे गटाचा खासदार असताना देखील उमेदवार जाहीर केलेला नाही. ( Lok Sabha Election 2024 News)
आता या मतदारसंघावर रिपाई आठवले गट आता दावा करू लागला आहे. त्यामुळे शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांचे टेन्शन वाढले आहे. शिवसेनेचे प्रमुख एकनाथ शिंदे यांनी उमेदवारीबाबत साधलेले चुप्पीमुळे राज्यातील शिवसेना नेते देखील अस्वस्थ आहेत.
राज्यात शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्ष अजित पवार गटाकडून एकाही उमेदवाराची घोषणा नाही. त्यामुळे या दोन्ही गटामधील नेत्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. इच्छुक देखील इतरत्र चाचपणी करू लागले आहेत. यातच रिपाई आठवले गट महायुतीत दबाव वाढवला आहे.
आठवले गटाच्या रिपाईच्या बैठक श्रीरामपूर येथील शासकीय विश्रामगृहावर झाली. या बैठकीनंतर पत्रकार परिषद झाली. यात केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना शिर्डीतून उमेदवारी द्यावी. अन्यथा रिपाईकडून सोलापूरसह शिर्डी व नगर दक्षिणमधून अपक्ष उमेदवारी दिली जाईल. तसेच भाजपच्या विरोधात प्रचार केला जाईल, असा इशारा रिपाईचे विजय वाकचौरे यांनी दिला. यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नगरला भेट घेणार असल्याचे सांगितले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
वाकचौरे म्हणाले, "लोकसभा निवडणुकीत आमच्या पक्षाला राज्यातील सोलापूर व शिर्डी या दोन जागा मिळाव्यात. यासाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे मागणी आहे. शिर्डीची जागा रामदास आठवले (Ramdas Athwale) यांच्यासाठी सोडावी. आठवले यांना राज्यसभा आणि मंत्रिपद देऊन शांत करणार असेल तर ते खपवून घेणार नाही. २००९ पासून भाजपबरोबर (Bjp) झोकून देवून काम करत आहोत. २०१४ मध्येही आम्ही प्रचार केला.
आमचे केंद्रात, राज्यात भलेही आमदार, खासदार नसतील. मात्र आमच्या पक्षाच्या जोरावरच सत्ता स्थापन करता आली. त्यामुळे भाजपने त्यांना राज्यसभेवर घेवून मंत्रिपद दिले. यावेळी भाजपने आम्ही मागणी केलेले दोन लोकसभा मतदारसंघ द्यावेच. सन्मानपूर्वक उमेदवारी मिळाली नाही, तर भाजप विरुद्ध प्रचार करू. या दोन्ही मतदार संघाबरोबर नगर दक्षिणला देखील अपक्ष उमेदवार देवू, असा इशारा वाकचौरे यांनी दिली