Nashik News : शिवसेनेचे खासदार (शिंदे गट) हेमंत गोडसे यांच्या अपयशाचा झेंडा भिरकावून लोकसभेचे रणशिंग फुंकणारे भाजपचे नेते दिनकर पाटील आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून लढणार, अशी चर्चा सोशल मीडियात रंगली आहे. पाटील यांनी आपण पक्षाशी एकनिष्ठ असल्याचे जाहीर केले आहे. ते भाजपकडून लोकसभेसाठी इच्छुक आहेत. त्यांचा प्रचारही सुरू आहे. पण लोकसभा उमेदवारी जाहीर होईपर्यंत पाटलांच्या इतर पक्षात जाण्याच्या ‘वावड्या’ उठणं काही थांबायचं नाव घेत नाहीत. त्यामुळे ते भाजपमध्ये राहणार दुसऱ्या पक्षात उडी मारणार, हे लवकरच समजेल. (LokSabha Election 2024)
नाशिक (Nashik) लोकसभा मतदारसंघावर शिवसेनेचा हक्क आहे. येथील शिवसेनेचे (ShivSena) (शिंदे गट) खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) हे तिसऱ्या टर्मसाठी इच्छुक असून, त्यांनी तशी तयारी सुरू केली आहे. मात्र, भाजपालाही या लोकसभा मतदारसंघात तितकाच रस आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या घडामोडी सुरू होण्याबरोबर भाजपचे (BJP) महापालिकेचे माजी सभागृह नेते दिनकर पाटील निवडणुकीच्या रिंगणात उतरले. पक्ष काय निर्णय घेईल ते घेईल, पण इच्छुक म्हणून काम करण्यास हरकत नसल्याचे त्यांनी वारंवार स्पष्ट केले आहे. किंबहुना पक्षाच्या नेत्यांनीच काम करण्याचे आदेश दिल्याचे पाटील यांनी ठणकावून सांगतात.
संपूर्ण मतदारसंघ दोनदा पिंजून झाला. वेगवेगळ्या सामाजिक व आध्यात्मिक कार्यक्रमांद्वारे मतदारापर्यंत पोहोचल्याचा दावा दिनकर पाटील करतात. अशावेळी भाजपला एवढा पात्र आणि तयार उमेदवार कुठे मिळणार, असा प्रश्न सर्वसामान्य मतदारांच्या मनात सहजच डोकावतो. मात्र, भाजप पक्षच मोठा! त्यांच्याकडून इतर नावेही पुढे येतात. त्याचवेळी दिनकर पाटील राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवार यांना भेटल्याची बातमी येते. दिनकर पाटील अशी भेट झालीच नसल्याचा आणि त्यांच्या पक्षात जाण्यची शक्यता फेटाळून लावतात. तसेच आपण पक्षाबरोबरच असल्याचे स्पष्ट करतात.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर येणार असून, दिनकर पाटील मनसेकडून निवडणूक लढवणार, अशी चर्चा सुरू झाली. तोच पाटील यांनी आपण पक्षाशी एकनिष्ठ असल्याचे जाहीर करून टाकले. अर्थात, पाटील यांच्या या दबावतंत्राचा भाजपवर काय परिणाम होतो, हे लवकरच समोर येईल. लोकसभेचे घोडामैदान दूर नाही. त्यावेळी सर्वच स्पष्ट होईल. मात्र, तोपर्यंत पाटील पक्षाशी एकनिष्ठ असतील आणि चर्चाही सुरू राहतील, एवढेच खरे!
(Edited By - Rajanand More)
R...
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.