

Maharashtra Government : अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांतील महिलांना दिवाळीनिमित्त मोफत साडी भेट देण्याची ‘कॅप्टिव्ह मार्केट योजना’ राज्यातील महायुती सरकारने बंद केली आहे. राज्याच्या आर्थिक तिजोरीवर भार पडत असल्याने ही योजना शासनाने बंद केल्याची चर्चा आहे. मात्र, मंत्री गिरीश महाजन यांनी यासंदर्भात महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.
साडी वाटप योजना बंद करण्यामागे आर्थिक चणचण नसल्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले. सरकार साडी वाटप योजना बंद केल्यानंतर त्या जागी नवीन योजना आणण्याच्या तयारीत असल्याचा दावा मंत्री महाजन यांनी केला आहे. जळगाव येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी याविषयावर भाष्य केलं.
मंत्री महाजन पुढे म्हणाले, रेशनच्या दुकानातून साड्या वाटायच्या यातून अनेक तांत्रिक व इतर प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळे महिलांना वस्तू द्यायची तर चांगलीच वस्तू द्यायची. महिलांना केवळ एक साडी देण्याऐवजी त्यांच्या कायमस्वरूपी हिताचा विचार करून अधिक उपयुक्त योजना राबवण्याचा विचार शासन करत आहे.
महिलांना साडी देण्याऐवजी अशी सुविधा किंवा वस्तू उपलब्ध करून द्यायची आहे, ज्यामुळे त्यांना भविष्यात फायदा होईल किंवा रोजगार मिळू शकेल. जेणेकरुन महिलांना आर्थिक सक्षमीकरणाच्या संधी मिळतील, यासाठी सरकार विविध पर्यायांवर विचार करत आहे. त्यासाठी थोडा अधिक खर्च झाला तरी चालेल, पण एक वेगळी योजना आणण्याचा विचार आम्ही करत आहोत असं महाजनांनी सांगितलं.
दरम्यान, एकीकडे लाडकी बहिण योजनेतून ९२ लाख महिलांची नावे वगळण्यात आली आहे. आता अंत्योदय शिधापत्रिका धारक कुटुंबियांना एक साडी भेट देण्याची योजनाही सरकारने बंद केली आहे. यावरुन विरोधकांकडून सरकारवर टीका होत आहे.
असे असताना, महिलांचा फायदा कसा होईल हे डोळ्यासमोर ठेऊन साडी ऐवजी वेगळी योजना राबवणार असल्याचं महाजन यांनी सांगितल्याने राज्य सरकारच्या नव्या योजनेकडे राज्यातील लाखो लाभार्थी महिलांचे लक्ष लागले असून नेमकी कोणती नवीन योजना आता जाहीर होते, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.