

Nashik News : मनमाड नगरपालिकेच्या निवडणुकीत अखेरच्या टप्प्यात राजकीय घडामोडींनी वातावरण तापले आहे. आमदार सुहास कांदे यांनी निवडणूक प्रतिष्ठेची केली असून येथील राजकीय समीकरणे बदलताना दिसत आहेत.
मनमाड नगरापालिकेत सुहास कांदे यांच्या नेतृत्वात शिवसेना शिंदे गट व भाजपाची युती झाली आहे. परंतु युती होऊनही सुहास कांदे यांनी ३३ पैकी भाजपला केवळ चारच जागा दिल्या. नगराध्यपदाचा उमेदवारही शिवसेनेचा दिला. त्यामुळे भाजपमधील अनेकांची उमेदवारी रद्द झाल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांनी भाजपला रामराम ठोकला आहे. त्यांनी समीर भुजबळ यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीत प्रवेश करुन निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे. ऐन निवडणुकीत समीर भुजबळांकडे इनकमिंग झाल्याने समीकरणे बदलणार आहे.
सुहास कांदे यांनी नगराध्यक्षपदासाठी योगेश पाटील यांना उमेदवारी दिली असून प्रचाराला सुरुवातही केली आहे. भाजप शिवसेना शिंदे गटाने यंदाच्या निवडणुकीत एकत्रित लढण्याचा निर्णय घेतला होता. परंतु एबी-फॉर्म न मिळाल्याने अनेक नाराज इच्छुकांनी शेवटच्या क्षणी राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांची वाट धरली. त्यामुळे या निवडणुकीत चार-पाच गट आमने-सामने येत असून संपूर्ण शहरातील राजकीय चित्र बदलले आहे. समीर भुजबळांनीही आपला उमेदवार रिंगणात उतरवला आहे.
दरम्यान शिवसेना शिंदे गट व भाजपची युती झाल्याने भाजपचे गणेश धात्रक यांची मोठी कोंडी झाली आहे. गणेश धात्रक हे नगराध्यक्षपदासाठी इच्छुक होते. परंतु भाजप व शिवसेनेच्या झालेल्या युतीमुळे त्यांना पक्षाकडून उमेदवारी मिळाली नाही. नगराध्यक्षपदासाठी धात्रक यांनी अपक्ष अर्ज दाखल केला असून, ते आता काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागून आहे. आज माघारीचा अखेरचा दिवस असल्याने धात्रकांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे. कारण धात्रक यांचे समर्थक समीर भुजबळ यांच्या गटात सामील झाले आहेत.
यांनी केला राष्ट्रवादीत प्रवेश
माजी नगरसेवक सुधाकर मोरे, नारायण पवार, विजय मिश्रा, सादिया अकबर सोनावाला, वंदना परब तसेच भारतीताई दुरगुडे, परेथ राऊत, पुष्पा करकाळे, अनिल डगळे, शोभा अहिरे, प्राजक्ता सुजित, मोसिन शेख, भागुबाई खुरसने, आनंद बोथरा, सतीश बहोत, काजळ पवार, संतोष सानप यांच्यासह मनमाड नगरपरिषदेतील आजी व माजी पदाधिकाऱ्यांनी समीर भुजबळांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी पक्षात पक्ष प्रवेश केला आहे.
या प्रवेशामुळे मनमाड नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीला अधिक बळ मिळाले आहे. समीर भुजबळ व सुहास कांदे दोघांचीही प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.