

Jamner election : जळगाव जिल्ह्यात १६ नगपालिकांसह २ नगरपंचायती अशा १८ ठीकाणी येत्या २ डिसेंबरला निवडणूक पार पडणार असून ३ डिसेंबरला निकाल लागणार आहे. मात्र त्यापूर्वी एक मोठी बातमी समोर आली आहे. जामनेर नगरपरिषदमध्ये भाजपने विजयाचा गुलाल उधळला आहे. यात नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन यांची बिनविरोध निवड झाली आहे.
इतर उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने साधना महाजन यांची नगराध्यक्षपदावर बिनविरोध निवड करण्यात आली. जामनेर नगरपरिषदेच्या निवडणुकीकडे जिल्ह्याचे लक्ष्य लागले होते. कारण पत्नी साधना महाजन या निवडणुकीला उभ्या राहिल्याने गिरीश महाजन यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती.
जामनेर नगर परिषदेमध्ये नगराध्यक्षपदाचे आरक्षण सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी जाहीर झाले होते. दरम्यान, नगराध्यक्षपदासाठी कोणाला उमेदवारी मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन यांना भाजपतर्फे उमेदवारी मिळाली होती. साधना महाजन यांना यापूर्वीही जामनेरच्या नगराध्यक्षा म्हणून काम करण्याचा अनुभव असल्याने त्यांना पुन्हा संधी दिली गेली होती.
ही निवडणूक बिनविरोधच व्हावी यासाठी मंत्री गिरीश महाजन हे गेल्या काही दिवसांपासून प्रयत्नशील होते. महाजन यांनी त्यासाठी पूर्ण ताकद लावली होती. अखेर महाजन यांच्या या प्रयत्नांना यश आले आहे. या निवडणुकीतील विरोधी पक्षातल्या तिन्ही उमेदवारांनी आज (दि. २०) माघार घेतली. त्यामुळे आता साधना महाजन यांचा मार्ग मोकळा होऊन त्या बिनविरोध निवडून आल्या आहेत.
साधना महाजन यांच्यासह उज्वला दीपक तायडे, किलुबाई शेवाळे, सपना रवींद्र झाल्टे, संध्या जितेंद्र पाटील, आणि नानाभाऊ बाविस्कर अशी आतापर्यंत बिनविरोध झालेल्या उमेदवारांची नावे आहेत. साधना महाजन यांच्या विजयासह जामनेर नगरपालिका जळगाव जिल्ह्यातील बिनविरोध नगराध्यक्ष निवडणारी पहिली नगरपालिका ठरली आहे.
दरम्यान भाजपाच्या बिनविरोधात निवडून येणाऱ्या उमेदवारांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता असून जामनेरमध्ये महाजन समर्थकांकडून ढोल ताशांच्या गजरात नाचून गुलालाची उधळण केली जात आहे. गिरीश महाजनांनी केलेला विकास व त्यांच्या नेतृत्वावर लोकांनी विश्वास ठेवल्याची प्रतिक्रिया त्यांच्या समर्थकांकडून उमटत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.