धुळे : (Dhule) शहरातील कचऱ्याची समस्या नव्या महापौरांचाही पिच्छा पुरवत आहे. सत्ताधारी भारतीय जनता पक्षासह (BJP) विरोधी पक्षांकडूनही (Shivsena) याबाबत तक्रारी आहेत. शहराच्या सर्व भागात कचऱ्याचे ढिग व दुर्गंधी असल्याचे नागरिक सांगतात. त्यामुळे संतप्त झालेल्या महापौर प्रतिभा चौधरी (Pratibha Choudhary) यांनी ठेकेदारांऐवजी थेट अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. एकंदर कचऱ्याची समस्या भाजपचा पाठलाग करीतच आहे. (Now Mayor will take actin against health department for garbage issue)
कचरा संकलनासाठी महापालिका ठेकेदाराला दरमहा ७०-८० लाख रुपये बिल अदा करते. त्यानंतरही शहरात कचऱ्याची समस्या असल्याच्या तक्रारी नगरसेवकांनी महासभेत केल्या. त्यामुळे ज्या प्रभागातील तक्रारी असतील त्या प्रभागाची जबाबदारी असलेल्या स्वच्छता निरीक्षक, मुकादमांवर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा महापौर प्रतिभा चौधरी यांनी दिला.
नवनिर्वाचित महापौर श्रीमती चौधरी यांनी मंगळवारी महापालिकेत आरोग्य विभागाची बैठक घेतली. उपमहापौर नागसेन बोरसे, महिला बालकल्याण समिती सभापती सारिका अग्रवाल, उपसभापती विमल पाटील, माजी उपमहापौर तथा नगरसेविका कल्याणी अंपळकर, नगरसेवक रावसाहेब नांद्रे, उपायुक्त विजय सनेर, मुख्य स्वच्छता निरीक्षक राजेश वसावे, लक्ष्मण पाटील यांच्यासह सर्व स्वच्छता निरीक्षक, मुकादम आदी उपस्थित होते.
बैठकीत श्रीमती अग्रवाल, श्रीमती अंपळकर, श्री. नांद्रे यांनी आपापल्या प्रभागातील समस्या मांडल्या. श्रीमती अंपळकर म्हणाल्या, की बैठका होतात मात्र त्यानंतर कार्यवाही काय झाली हे आता जास्त महत्त्वाचे आहे. स्वच्छतेसाठी प्रभागांमध्ये नियुक्त अधिकारी-कर्मचारी वर्षानुवर्ष तेच आहेत. त्यांच्या बदल्या होणे आवश्यक असल्याचेही त्या म्हणाल्या. श्रीमती अग्रवाल यांनी प्रभागातील मोहाडीत दोनच सफाई कर्मचारी असल्याचा मुद्दा मांडला.
शंभर टक्के दगड माती
श्री. नांद्रे यांनी आपल्या प्रभागातील मोराणे येथे गटारातील घाण उचलण्यासाठी महिनोंमहिने ट्रॅक्टरच येत नसल्याचे सांगितले. घंटागाड्यांमध्ये शंभर टक्के दगड-माती भरली जाते असेही त्यांनी नमूद केले. मोराणे येथील शौचालयांची साफसफाई होत नसल्याचा मुद्दाही त्यांनी मांडला.
...तर कारवाई निश्चित
महापौर श्रीमती चौधरी यांनी साफसफाई करून जमा झालेला कचरा सफाई कर्मचारीच गटारात ढकलतात त्यामुळे एका ठिकाणी कचरा जमा करा व तेथून तो उचला असे सुचित केले. दरम्यान, स्वच्छतेबाबत, कचरा संकलनाबाबत नगरसेवकांनी महासभेत तक्रार केली तर संबंधित प्रभागाची जबाबदारी असलेल्या स्वच्छता निरीक्षक, मुकादमांवर कठोर कारवाईचे निर्देश आयुक्तांना देणार आहे. कचरा संकलन करणाऱ्या स्वयंभू ट्रान्सपोर्टला मनपा दरमहा ७०-८० लाख रुपये बिल अदा करते. असे असताना समस्या असतील तर साटंलोट आहे का, पाठिशी घालण्याचे कारण काय असा सवालही त्यांनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.