Nashik News : वादळ, गारपीट व अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतपीकांचे अतोनात नुकसान झाले आहे. अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासनस्तरावर विशेष निधी मिळावा आणि शेतकऱ्यांचे नुकसान टळावे म्हणून क्रॉप कव्हर योजनेसाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांनी केले.
गुरुवारी येवला व निफाड तालुक्यातील वादळ, गारपीट व अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीची पाहणी मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केली त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी समवेत उपविभागीय अधिकारी येवला बाबासाहेब गाढवे, उपविभागीय अधिकारी निफाड हेमांगी पाटील, येवला तहसिलदार आबा महाजन, निफाड तहसिलदार शरद घोरपडे, येवला तालुका कृषी अधिकारी शुभम बेरड, निफाड तालुका कृषी अधिकारी सुधाकर पवार यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
यावेळी छगन भुजबळ यावेळी म्हणाले, ''अवकाळीमुळे शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे हे जलदगतीने करण्यात यावेत यात एकही बाधित शेतकरी सुटता कामा नये. बाधित शेतकऱ्यांच्या पाल्यांच्या शालेय शिक्षण फी माफीबाबतही योग्य निर्णय घेण्यात येणार आहे. बाधित क्षेत्राचा विचार करता पीक विम्याबाबत सुध्दा शासन स्तरावरून प्रयत्न करणार आहे.'' असे छगन भुजबळ यांनी शेतकऱ्यांना अश्वासित केले, तसेच ‘खचून जाऊ नका’ असं म्हणत मंत्री छगन भुजबळ यांनी बाधित शेतकऱ्यांना धीर दिला.
मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून अवकाळीग्रस्त शेतीची पाहणी करत असतांना महिला शेतकऱ्यांना आपले अश्रू अनावर झाले. यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी ''धीर धरा, खचून जाऊन नका. सरकार आपल्या सोबत असून शासनाच्या वतीने जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून दिला जाईल.'' असा विश्वास देत त्यांना धीर दिला.
गुरुवारी मंत्री छगन भुजबळ यांनी येवला तालुक्यातील कातरणी, सोमठाण देश व निफाड तालुक्यातील वेळापूर, पिंपळगाव नजिक, वनसगांव या गावांत वादळ, गारपीट व अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतपीकांच्या नुकसानीची पाहणी केली.
यावेळी छगन भुजबळांनी म्हटले की ''अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू असतांना ही राजकारण करण्याची वेळ नाही, तर त्यांना धीर देऊन त्यांचे अश्रू पुसण्याची वेळ आहे. यामध्ये सर्वच पक्षांनी कुठलही राजकारण न करता एकत्र येऊन शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्याची गरज आहे. शेतकऱ्यांना शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळावी यासाठी अधिकाऱ्यांसमवेत सत्य परिस्थिती समजून घेण्यासाठी आपण पाहणी केली आहे.'' असं भुजबळ म्हणाले.
याशिवाय ''राजकारण करणारे राजकारण करत असतात, आज ज्यांनी विरोध दर्शविण्याचा प्रयत्न केला त्यामधील काही लोक हे त्या गावातील देखील नव्हते. त्यामुळे त्यांचा होणारा विरोध हा राजकीय असून मतदारसंघातील जनता आपल्या सोबत आहे. शेतकऱ्यांवर आलेल्या या वेळी त्यांना धीर देणे अतिशय महत्वाचे असून, या कुणीही राजकारण आणू नये, हीच अपेक्षा.'' असे मत छगन भुजबळ यांनी व्यक्त केले.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.