Nagar News : नगर शहरात गेल्या काही महिन्यांपासून गुन्हेगारीच्या घटना वाढल्या आहेत. व्यापाऱ्यांसह सर्वसामान्यांमध्ये असुरक्षितेची भावना असून, कधी कोणती घटना कोणाबरोबर घडेल, याचा नेम नाही. नगर शहरातील वाढत्या गुन्हेगारीवरून राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी गृह विभागाच्या पोलिस प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला आहे.
नगर शहराच्या सावेडी भागात असलेल्या उच्चभ्रू वसाहतीतील किर्लोस्कर काॅलनीतील व्यापारी धीरज मदनलाल जोशी (वय 54) यांच्यावर दुचाकीवरून आलेल्या दोघा शस्त्रधारी हल्लेखोरांनी हल्ला चढवला. या हल्ल्यात जोशी गंभीर जखमी झाले. जोशी यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यात हल्लेखोर गावठी पिस्तुल आणि तलवार घेऊन आले होते.
ही घटना कळताच आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी रुग्णालयात धाव घेत जखमी जोशी यांच्या परिवाराला मदत केली. याच घटनेदरम्यान भिंगार शहरातील एका जुगार अड्ड्यावर राडा होऊन तिथे झालेल्या मारामारीत एकजण गंभीर जखमी झाला आहे. जखमी झालेल्यांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नगर शहरातील वाढती गुन्हेगारी नित्याची झाली आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
विधीमंडळात देखील नगर शहरातील गुन्हेगारीचा मुद्दा गाजला आहे. आमदार बाळासाहेब थोरात यांनी नगर शहरातील गुन्हेगारीवर राज्य सरकारचे लक्ष वेधले होते. यानंतर आमदार जगताप यांनी देखील शहरातील गुन्हेगारीचा मुद्दा विधीमंडळात लावून धरला होता. यानंतर राज्य सरकार शहरातील वाढत्या गुन्हेगारीला रोखण्यासाठी काही ठोस भूमिका घेतील, असे वाटत होते.
परंतु तसे काहीच झाले नसून, गुन्हेगारी वाढतच असल्याचे चित्र आहे. व्यापारी जोशी यांच्यावरील हल्ल्यासह शहरातील वाढत्या गुन्हेगारीवरून आमदार जगताप यांनी संताप व्यक्त केला आहे. ते म्हणाले, "राज्यात गुन्हेगारी वाढली आहे. नगरमधील व्यापाऱ्यांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध करतो. राज्यातील पोलिस प्रशासनाची गोपनीय यंत्रणा कमकुवत झाल्याचे दिसते.
पोलिस प्रशासनाविरोधात राज्यभरात संताप आहे. राज्यभरात गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत. लोकांमध्ये देखील भीती आणि संताप आहे. गुन्हेगारांकडे शस्त्र येताच कोठून ? शस्त्र तस्करी करणारे हे आणतात कोठून ? पोलिस कारवाई करतात, पण ती थातूरमातूर होते आणि दोन दिवसात शस्त्र तस्करी करणारे सुटतात.
पोलिसांकडून शस्त्र तस्कारांविरोधात मूळापर्यंत तपास होत नाही" नगर शहरासह राज्यातील घटनेबाबत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आवाज उठवणार आहोत. राज्यातील नागरिक सुरक्षित राहण्यासाठी सरकार आणि गृहविभागामार्फत कारवाई होणे गरजेचे असल्याचे आमदार जगताप यांनी म्हटले.
(Edited by Amol Sutar)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.