

Maharashtra Legislative Council : राज्यातील 17 स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांच्या विधान परिषद निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे.
या निवडणुकीत उमेदवारी दाखल करू इच्छिणाऱ्या इच्छुकांसाठी निवडणूक आयोगाने काही महत्त्वाचे नियम आणि अटी स्पष्ट केल्या आहेत. विशेष म्हणजे, कोणतीही व्यक्ती उमेदवार होऊ शकते; मात्र त्यासाठी स्थानिक मतदार यादीतील 10 सूचक अनिवार्य असणार आहेत.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांच्या विधान परिषद निवडणुकीत (MLC Election) उमेदवारी करण्यासाठी संबंधित व्यक्ती राज्यातील कोणत्याही विधानसभा मतदारसंघाच्या मतदार यादीत नोंद असणे आवश्यक आहे. म्हणजेच, अहिल्यानगर मतदारसंघातून जळगाव किंवा अन्य जिल्ह्यातील व्यक्तीलाही उमेदवारी करता येऊ शकते.
मात्र, अशा उमेदवाराला संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या मतदार (Voter) यादीतील किमान 10 मतदारांचे सूचक म्हणून समर्थन आवश्यक असणार आहे. त्यामुळे अपक्ष किंवा बाहेरील उमेदवारांसाठी ही अट मोठे आव्हान मानली जात आहे. कोण नगरसेवक, नगराध्यक्ष, महापौर किंवा स्थानिक प्रतिनिधी अशा उमेदवाराच्या पाठीशी उभे राहणार, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे.
या निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राऐवजी मतपत्रिकेचा वापर केला जाणार आहे. मतदारांना उमेदवारांना पसंती क्रमांक देत मतदान करावे लागणार आहे. मतदानासाठी भारत निवडणूक आयोगाकडून प्रत्येक केंद्रावर विशेष पेन उपलब्ध करून दिले जाणार आहे. मतदान प्रक्रियेसाठी जंबो बॅलेट बॉक्सची व्यवस्था करण्यात आली असून, संपूर्ण प्रक्रियेवर देखरेख ठेवण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून स्वतंत्र निवडणूक निरीक्षक नियुक्त केला जाणार आहे.
दरम्यान, अहिल्यानगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच अहिल्यानगर कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या निवडणुका अद्याप झालेल्या नसल्याने त्या संस्थांच्या सदस्यांचा मतदार यादीत समावेश नाही. त्यामुळे संबंधित क्षेत्रांमध्ये आचारसंहिता लागू करायची की नाही, याबाबत जिल्हा प्रशासनाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे मार्गदर्शन मागितले आहे.
तथापि, सध्याच्या स्थितीत जिल्ह्यात आचारसंहिता लागू करण्यात आली असून, पक्षीय झेंडे, पोस्टर्स आणि बॅनर्स हटवण्याची कारवाई सुरू आहे. सार्वजनिक मालमत्तेचे विद्रूपीकरण केल्यास गुन्हे दाखल करण्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.
राज्यातील विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात आला आहे .
25 मे : उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात
1 जून : उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत
2 जून : अर्जांची छाननी
4 जून : उमेदवारी माघारीची अंतिम तारीख
18 जून : मतदान (सकाळी 8 ते सायंकाळी 4)
22 जून : मतमोजणी, जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयांमध्ये मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात येणार असून, मतमोजणी जिल्हास्तरावर होणार आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांना खुल्या प्रवर्गासाठी 10 हजार रुपये, तर राखीव प्रवर्गासाठी 5 हजार रुपये अनामत रक्कम जमा करावी लागणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.