Ahmednagar News: महाराष्ट्रातील दुकाने, आस्थापनांवर मराठी भाषेतून फलक लावल्याच पाहिजेच, असा निकाल सर्वोच्च न्यायालय देऊन तीन महिन्यापेक्षा जास्त काळ होऊन गेला. राज्यात या आदेशाची किती अंमलबजावणी झाली, हा संशोधनाचा विषय आहे.
नगर जिल्ह्यातील दुकाने आणि आस्थापनांवर मराठी भाषेत फलक लावणे बंधनकारक असल्याचे फर्मान आता सहायक कामगार आयुक्तांनी काढले आहेत. मराठी फलकांसाठी आता प्रशासन मैदानात उतरले असल्याने मनसेने लावून धरलेल्या या मराठीच्या मुद्यावर राज्यात कार्यकर्त्यांनी किती जागृती केली, किती सतर्क राहिले, हा विषय आता चर्चेत आला आहे.
नगर जिल्ह्यातील सहायक कामगार आयुक्त कार्यालयाने मराठी फलकांबाबत पत्रक काढले आहेत. नगर जिल्ह्यातील दुकाने आणि आस्थापनांवर मराठीत (देवनागरी लिपीत) फलक असणे कायद्याने बंधकारक असल्याचे या पत्रकात म्हटले आहे. महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियम 2017 तरतुदींनुसार हे मराठी भाषेत फलक असणे बंधनकारक असल्याचे यात म्हटले आहे.
यामुळे नगर जिल्ह्यातील सर्व व्यावसायीक, औद्योगिक आस्थापना मालकांनी आस्थापनेचा नामफलक मराठी भाषेत (देवनागरी लिपीत) लावण्याची अंमलबजावणी करण्याचे आवाहन सहायक कामगार आयुक्त नि.कृ.कवले यांनी केले आहे. अधिनियमामधील तरतुदींचे उल्लंघन केल्यास एक लाख रुपयांपर्यत दंड होईल. तसेच उल्लंघन करण्याचे चालू ठेवल्यास, त्या कालावधीतील प्रत्येक दिवसासाठी दोन हजार रुपयांपर्यंत दंड असू होऊ शकतो, अशी माहिती कवले यांनी दिली.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
मराठी फलकासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने सप्टेंबर 2023 च्या शेवटाला निकाल दिला. राज ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर 'एक्स'वर भली मोठी पोस्ट शेअर करत मनसे कार्यकर्त्यांच्या मराठीसाठी दिलेल्या लढ्याचे कौतुक केले. तसेच महाराष्ट्रातील प्रत्येक दुकान आणि आस्थापानावर मराठी फलक हवा, हे आता महापालिका आणि पोलीस प्रशासनाचे काम आहे, असे देखील सांगितले.
नगर जिल्ह्यात आता प्रशासनाने मराठी फलकांसदर्भात पत्र काढून सरकारी सोपास्कार पूर्ण केले. प्रत्यक्षात मात्र कारवाईचा मुहूर्त कधी लागेल, हे पुढील काळात कळेल. मराठी फलकांबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी सुरूवातीला स्थानिक स्वराज्य संस्थाना याबाबत निवेदन दिले. खळखट्याकचा इशारा दिला.
यानंतर मात्र कार्यकर्ते या मुद्यावर किती काम केले हे दुकाने आणि आस्थापनांवरील फलक पाहिल्यानंतर लक्षात येते. राज्यात पुणे, मुंबईत काही बोटावर मोजता येईल, एवढी मनसे कार्यकर्त्यांनी खळखट्याक आंदोलने केली. यानंतर अपेक्षेप्रमाणे रिझल्ट मनसे कार्यकर्त्यांना मिळाला का, याची चर्चा होत आहे.
मुळात मराठी ही राज्याची भाषा आहे. तिला इतिहास आहे. राज्यात मराठी भाषेवर आणि मराठी जणांसाठी लढा देणारी एकमेव कोणती संघटना किंवा पक्ष असेल, तर ती मनसे आहे. मराठा हा विषय फक्त मनसेचा नसून संपूर्ण महाराष्ट्राचा, मराठीजणांचा आहे.
प्रशासन आणि सरकारने मराठी भाषेबाबत फक्त कागदी सोपास्कार पार पाडल्यास पुन्हा मनसेशी गाठ आहे. राज ठाकरे यांच्या आदेशानुसार आम्ही सतर्क आहोत, असे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे राज्य उपाध्यक्ष सुमित वर्मा यांनी 'सरकारनामा'शी बोलताना सांगितले.
Edited By- Ganesh Thombare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.