
Nashik Politics : नाशिकमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षांच्या या बैठकीला विशेष महत्व होतं. मात्र बैठक सुरु असताना विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या मुद्द्यावरुन ठाकरे गटाच्या दोन पदाधिकाऱ्यांमध्ये मोठा वाद झाला. यावेळी झालेल्या शाब्दिक चकमकीवरुन बैठकीत तणाव निर्माण झाला. या वादाची नाशिकमध्ये जोरदार चर्चा सुरु आहे.
शिवसेना (उबाठा)च्या शालिमार येथील कार्यालयात बैठक सुरु होती. बैठकीत एक-एक करुन पदाधिकारी आपले मत व्यक्त करत होते. त्याचवेळी शिवसेना(उबाठा) चे दिंडोरीचे संपर्क प्रमुख जयंत दिंडे भाषणासाठी उभे राहिले होते. त्यांनी भाषणाच्या शेवटी विधानसभा निवडणुकीचे स्वत:चे मत मांडले. नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघात वसंत गितेंचा पराभव झाला. त्याविषयी बोलताना जयंत दिंडे म्हणाले, आपण एमडी ड्रग्जचा मुद्दा नीट हाताळला नाही. तो मुद्दा जर प्रचारात घेतला नसता तर वसंत गितेंचा विजय झाला असता अशा स्वरुपाचे वक्तव्य दिंडे यांनी केले. तिथेच वादाला तोंड फुटलं.
त्याचवेळी वसंत गिते यांचे अगदी जवळचे मित्र व माजी महापौर विनायक पांडे हे उभे राहीले. कारण वसंत गिते व पांडे या दोघांनी मिळून प्रचाराची संपूर्ण रणनिती आखली होती. त्यावरुन विनायक पांडे हे दिंडे यांच्या वक्तव्यावर संतापले. विनायक पांडे यांनी जर 40 वर्षांमध्ये आम्ही आमचा लढा देत होतो, तर आम्ही 40 वर्ष नेमकं केलं काय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यानंतर जयंत दिंडे यांनी संपूर्ण प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. त्यांनी माफी मागितली. परंतु विनायक पांडे यांनी चालू सभेतून काढता पाय घेतला, ते तडकाफडकी तिथून निघून गेले. मनसेच्या दिनकर पाटील यांनी त्यांना आवाज देऊन थांबवण्याचा प्रयत्न केला पण तरीही ते थांबले नाही.
गेल्या काही दिवसांपासून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांच्या युतीच्या चर्चा सुरु आहेत. त्यापार्श्वभूमीवर मनसे व शिवसेना(उबाठा)च्या कार्यकर्त्यांचही मनोमिलन आज झालं होत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना व उद्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शहरातील सर्व प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या उपस्थिती महत्वाची बैठक सुरु होती.
नाशिक शहरातील रस्त्यावरील खड्डे, वाढती गुन्हेगारी, अनियमित पाणीपुरवठा, तसेच शेतकऱ्यांचे प्रश्न या विषयांवर विशेष चर्चा या बैठकीत करण्यात येत होती. त्यातच जयंत दिंडे यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा मुद्दा मांडल्याने वाद झाला. विनायक पांडे बैठक सोडून निघून गेले. त्यामुळे बैठकीतील इतर मुद्द्यांपेक्षा या राड्याचीच जास्त चर्चा सध्या नाशिकच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.