
Nashik News : मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेची १११ वी वार्षिक सर्वसाधरण सभा अपेक्षेप्रमाणे वादळी ठरली. विद्यापीठ स्थापनेच्या मुद्द्यावरुन बैठकीत सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये थेट व्यासपीठावरच धक्काबुक्की आणि बाचाबाची झाल्याने मोठा गोंधळ उडून चांगलाच राडा झाला.
यावेळी सभेत खासगी विद्यापीठ हेच संस्थेसाठी फायदेशीर असल्याची भूमिका घेत सत्ताधाऱ्यांकडून मविप्र विद्यापीठ स्थापन करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. परंतु या प्रस्तावाला विरोधी गटाने जोरदार विरोध दर्शविला व नाही, नाही अशा घोषणा दिल्या. क्लस्टर विद्यापीठ हेच संस्थेतील लोकशाही पद्धतीला जिवंत ठेवणार असल्याचा दावा यावेळी विरोधकांनी केला.
त्यानंतर सत्ताधाऱ्यांकडून गोंधळात हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. तर विरोधकांनी हा प्रस्ताव नाकारला. यावेळी व्यासपीठावरुन विरोधी गटातील सदस्यांनी घोषणाबाजी केली. दोन्ही गटात बाचाबाची झाल्याने सत्ताधाऱ्यांना या सर्व गोंधळातच सभा आटोपती घ्यावी लागली.
गेल्या पंधरा दिवसांपासून मविप्र विद्यापीठ स्थापनेच्या मुद्यावरुन सत्ताधारी व दोन्ही गटात जुंपली आहे. सत्ताधारी गटाकडून विद्यापीठ हा हिताचा निर्णय असल्याचे पटवून दिले जात आहे. त्यासाठी सत्ताधारी आग्रही आहे. परंतु खासगी विद्यापीठ निर्मितीला विरोधकांचा पूर्णपणे विरोध आहे. याच मुद्द्यावरून वार्षिक सभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार राडा झाला. (Nashik News)
दरम्यान, मविप्र संस्थेसाठी मार्गदर्शक असलेले शरद पवार हे देखील नाशिकमध्ये आहेत. त्यापार्श्वभूमीवर वार्षिक सर्वसाधरण सभेआधी विरोधी गटाचे मविप्रचे अध्यक्ष सुनील ढिकले आणि त्यानंतर सत्ताधारी गटाचे सरचिटणीस नितीन ठाकरे या दोघांनीही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. सुनिल ढिकले यांनी भेट घेतली त्यावेळेला शरद पवारांनी मविप्र संस्थेत स्वयंम सहाय्यित विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय विचाराधीन असला तरी त्या विद्यापीठाला आपली पसंती नाही असे सांगितले होते. तर नितीन ठाकरे यांनी भेट घेतली त्यावेळी व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी संस्थेचे विद्यापीठ निर्मिती ही काळाची गरज असल्याचे म्हटले होते.
२०२२ मध्ये झालेल्या संस्थेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची भूमिका महत्वाची राहिली होती. अशात आता विद्यापीठ स्थापनेचा हा वाद देखील पवारांच्या दरबारात पोहचला. पवार हे याबाबत काय भूमिका घेतात याकडे सभासदांचे लक्ष असताना मात्र दोन्ही गटाने पवारांची भेट घेऊन केलेल्या वेगवेगळ्या दाव्यांमुळेही गोंधळ उडाला. त्यामुळे पवारांची नेमकी भूमिका स्पष्ट होऊ शकली नाही.
दरम्यान वार्षिक सर्वसाधरण सभेत मविप्र विद्यापीठाचा ठराव मंजूर झाल्याचे सांगत सरचिटणीस अॅड नितीन ठाकरे यांनी फेसबुक पोस्ट केली आहे. गुंडगिरी आणि दंडेलशाहीला न जुमानता मविप्र सभासदांनी ऐक्याचे दर्शन घडविले. जागरूक सभासदांनो आभार ! तुमच्यामुळेच मविप्र विद्यापीठ स्थापनेचा मार्ग आता मोकळा झाला. अशी पोस्ट त्यांनी केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.